गच्चीवर झोपल्याची संधी साधत चोरटय़ांनी केली शिरपूरात घरफोडी
By Admin | Updated: June 24, 2017 13:08 IST2017-06-24T12:15:28+5:302017-06-24T13:08:21+5:30
प्रेमकमल नगर कॉलनी परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरटय़ांनी 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

गच्चीवर झोपल्याची संधी साधत चोरटय़ांनी केली शिरपूरात घरफोडी
ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.24 - शहरातील प्रेमकमल नगर कॉलनी परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरटय़ांनी 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. घरमालक गच्चीवर झोपले असल्याची संधी साधत चोरटय़ांनी घरफोडी केली. याप्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
धुळे तालुक्यातील बोरीस येथील हेमंत जगन्नाथ चौधरी हे व्यवसायानिमित्त शिरपूर येथील प्रेमकमल नगर कॉलनीतील कपिल पाटील यांच्या घरात भाडय़ाने राहतात. बुधवारी रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर हेमंत व त्यांच्यासोबत राहणारा शरद मुरलीधर शिंदे हे रात्री 11 वाजता गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. गुरुवारी पहाटे ते खाली उतरले. त्यावेळी त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यांनी घरात तपासणी केली असता त्यांना 19 हजार रुपये रोख लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात हेमंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.