चोपड्याच्या दोघांचा कावठे शिवारात अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 22:36 IST2021-02-15T22:35:14+5:302021-02-15T22:36:08+5:30
अपघाताची नोंद साक्री पोलीस ठाण्यात

चोपड्याच्या दोघांचा कावठे शिवारात अपघाती मृत्यू
धुळे : साक्री तालुक्यातील कावठे शिवारात फेरेजपूर फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मोरीत फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. यात चोपडा येथील दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची नोंद साक्री पोलीस ठाण्यात करण्यात आली.
सुरत येथून नामदेव राजाराम माळी (४०) आणि रितेश कैलास माळी (२३) (दोन्ही रा. तारामतीनगर, चोपडा) हे दोन्ही जीजे ०५- ईडब्ल्यू ६८४७ क्रमांकाच्या दुचाकीने साक्री तालुक्यातील म्हसाळे येथे लग्नासाठी आले होते. दोन दिवस ते अगोदर आल्यामुळे चोपडा येथे जाण्याचे त्यांनी ठरविले. साक्री तालुक्यातील कावठे शिवारात पेरेजपूर फाटाजवळील एका लहान पुलावर त्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या एका वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्हीही मोरी पुलाच्या खाली फेकले गेले. अपघातातील नामदेव माळी आणि रितेश माळी या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी सुनील राजाराम माळी (३५, रा. तारामतीनगर, चोपडा) यांनी साक्री पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, १४ फेब्रुवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पी.एम. बनसोडे घटनेचा तपास करीत आहेत.