कोरोना काळात बालविवाह वाढले, विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र!गुन्हे दाखल होत असल्याने धुळे जिल्ह्यात बालविवाहांना बसला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST2021-07-18T04:26:06+5:302021-07-18T04:26:06+5:30
कोरोना काळात चाईल्ड लाईन, बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती यांनी कारवाईचा धडाका लावत बालविवाह रोखले. गेल्या महिन्यात धुळे शहरात ...

कोरोना काळात बालविवाह वाढले, विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र!गुन्हे दाखल होत असल्याने धुळे जिल्ह्यात बालविवाहांना बसला चाप
कोरोना काळात चाईल्ड लाईन, बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती यांनी कारवाईचा धडाका लावत बालविवाह रोखले. गेल्या महिन्यात धुळे शहरात विटाभट्टी आणि मोहाडी भागात बालविवाह रोखून गुन्हे दाखल केले आहेत. काही महिन्यांपूर्वी साक्री तालुक्यात छडवेल आणि हट्टी येथे देखील बालविवाहाचे गुन्हे दाखल झाले.
बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात सातत्याने जाणीवजागृती सुरू असते. बालविवाह होत असेल तर नागरिकांनी चाईल्ड लाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांनी केले.
पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?
माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांच्या तुलनेत मुलींची पटसंख्या कमी आहे. पटसंख्या कमी होण्यास इतरही अनेक कारणे आहेत. परंतु काही प्रमाणात बालविवाहदेखील झाल्याचे समोर आले.
दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र?
कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण काहीसे वाढले आहे. गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने काही पालकांनी मुलींचे लग्न लावून देण्याच्या घटना समोर आल्या. या मुली शाळेत आल्या नाहीत. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र दिसले.
बालविवाहामागे आर्थिक गणित...
नोकरीवाला मुलगा किंवा आपल्यापेक्षा चांगली परिस्थिती असलेल्या कुटुंबाचे स्थळ आले तर पालक आर्थिक बाजुकडे झुकतात. मुलीच्या भवितव्याचा केवळ आर्थिक विचार त्यांच्या डोक्यात असतो. स्वत:ची आर्थिक परिस्थितीही निमित्त ठरते.
३८ वर्षांच्या शिक्षकाचा १६ वर्षाच्या मुलीशी विवाह रोखला
जुन्या चालिरितींमुळे काही समाजांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आजही मोठे आहे. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर चाईल्ड लाईनकडे तक्रारी दाखल होतात. त्यानंतर चाईल्ड लाईन, बालसंरक्षण कक्ष आणि पोलिसांचे पथक बालविवाह रोखतात. त्यानंतर बालकल्याण समितीमार्फत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो, अशी माहिती चाईल्ड लाईनच्या सदस्या मीना भोसले यांनी दिली. नोकरीवाला मुलगा, श्रीमंत स्थळ, मुलगी मोठी झाली तर लग्न होईल की नाही अशी चिंता, या कारणांमुळे बालविवाह होतात. ३८ वर्षांच्या शिक्षकाचे १६ वर्षाच्या मुलीशी लग्न आम्ही रोखले आहे. ज्यांनी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तेच लोक बालविवाहाला प्रोत्साहन देताना दिसतात. ही चिंतेची बाब असल्याचे मीना भोसले यांनी सांगितले.
बालविवाह केल्याने मुलींच्या आयुष्याचे नुकसान होते. पालकांनी बालविवाह न करता मुलींना शिक्षण दिले पाहिजे. त्यांना पायावर उभे राहण्याची संधी दिली पाहिजे. योग्य वयातच लग्न करावे. - हेमंतराव भदाणे, महिला व बालकल्याण अधिकारी
काही समाजातील जुन्या चालीरितींमुळे बालविवाहाचे प्रमाण आजही मोठे आहे. मुलगी मोठी झाली तर मुलगा भेटणार नाही अशी भीती असते. परंतु पालकांनी लहान वयात मुलींचे लग्न करू नये. - मीना भासले, सदस्य, चाईल्ड लाईन