पिंपळनेर :अंगावर वीज पडल्याने साडेपाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. तर त्याच्या आईला विजेचा झटका बसला. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विजयपूर (ता. साक्री) येथे घडली. सुरज देवचंद अहिरे असे मृत बालकाचे नाव आहे.पिंपळनेर परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन नंतर ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. सायंकाळी चार वाजता पाऊस सुरू झाला. त्यावेळी शेतकरी देवचंद हासिराम अहिरे हे पत्नी सुनीता व मुलगा सुरज यांच्यासमवेत शेतात होते. पाऊस सुरू झाल्याने अहिरे परिवार शेतातून घराकडे येण्यास निघाला. त्यावेळी पुन्हा विजेचा कडकडाट झाला. साडेपाच वर्षाच्या सुरजच्या अंगावर वीज पडल्याने तो ८० टक्के भाजला. तर आईला विजेचा जोरदार झटका बसल्याने ती शेतात फेकली गेली. अशाही परिस्थिीत आई उठली. देवचंद अहिरे यांनी मुलाला उचलून पिंपळनेर ग्रामीण रूग्णालय गाठले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक नुक्ते यांनी तपासून सुरजला मृत घोषित केले. लहान मुलाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने पालकांनी हंबरडा फोडला.घटनेची माहिती विजयपुरचे पोलीस पाटील आर.एस.गवळी यांनी तलाठी, ग्रामसेवक व पिंपळनेर पोलीस स्टेशनला दिली. तलाठी दिलीप चव्हाण यांनी पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल दिला.
अंगावर वीज पडल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:05 IST