डेंग्यूसोबतच चिकुनगुण्या संशयित रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:22+5:302021-09-11T04:37:22+5:30
धुळे : जिल्ह्यात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूसोबतच चिकुनगुण्यासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरातील आठ ...

डेंग्यूसोबतच चिकुनगुण्या संशयित रुग्ण वाढले
धुळे : जिल्ह्यात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूसोबतच चिकुनगुण्यासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरातील आठ चिकुनगुण्यासदृश रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात आतापर्यंत १०९ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. धुळे शहरातील ६१, तर ग्रामीण भागातील ४८ रुग्णांचा त्यानं समावेश आहे. अद्याप चिकुनगुण्याच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मात्र, चिकुनगुण्यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. चिकुनगुण्या आजारासारखी लक्षणे असलेल्या आठ रुग्णांचे सॅम्पल हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल शनिवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. डेंग्यूनंतर आता चिकुनगुण्याच्या संशयित रुग्णांमुळे चिंतेत भर पडली आहे.
चिकुनगुण्या लक्षणे - चिकुनगुण्याचे प्रमुख लक्षण ताप आहे. तापासोबतच सांधेदुखीही अधिक असते. तसेच मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा अशी लक्षणे दिसतात. पुरळ व डोकेदुखी ही लक्षणे डेंग्यू व चिकुनगुण्या दोन्ही आजारांमध्ये दिसतात. डेंग्यूपेक्षा अधिक सांधेदुखी चिकुनगुण्या या आजारात असते.
संशयित रुग्णांची रक्ताची चाचणी -
ज्या रुग्णांना सांधेदुखी, ताप, थकवा येणे अशी चिकुनगुण्यासारखी लक्षणे आहेत. त्यांच्या रक्ताचा नमुना घेऊन हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. सुदैवाने आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही; पण संशयित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.