तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्र्यांनी केली प्रशासनाशी चर्चा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:25+5:302021-07-19T04:23:25+5:30

कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ...

Chief Minister discusses third wave with administration; District Collector orders action against violators | तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्र्यांनी केली प्रशासनाशी चर्चा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्र्यांनी केली प्रशासनाशी चर्चा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सुभाष कोटेचा, जयश्री शहा आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, धुळे जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी दिसत असली, तरी अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे. धुळे जिल्हा महामार्गांवरील जिल्हा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाने व्यावसायिकांना दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसायास अनुमती दिली आहे. त्यानंतरही अनेक दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर आहे. शनिवार, रविवारी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. ग्राहकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरच्या नियमित वापरासाठी प्रवृत्त करावे.

राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यंत्रणेने कारवाई करावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निर्धारित वेळेत आस्थापना बंद होतील, अशी दक्षता घ्यावी. त्यासाठी व्यापारीपेठेत नियमितपणे पाहणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापली पथके गठित करावीत. फेरीवाले, विक्रेते, व्यावसायिकांच्या कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे. तसेच व्यावसायिक, विक्रेत्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या.

पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले, राज्य शासनाने नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. विनामास्क आणि निर्धारित वेळेनंतरही रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.

आयुक्त शेख यांनी सांगितले, ‘कोविड- १९’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. निर्धारित वेळेत आस्थापना बंद होतील, असे नियोजन करण्यात येत आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बंग यांनी सांगितले, राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही. नियमांच्या अंमलबजावणीसाठी व्यापारी महासंघातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. त्यासाठी पथकेही गठित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister discusses third wave with administration; District Collector orders action against violators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.