‘स्थलांतरीत’ विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी धुळे जिल्ह्यातील चारणपाडा शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 13:31 IST2020-02-10T13:31:36+5:302020-02-10T13:31:58+5:30
नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर : वर्षभर विविध उपक्रम राबविण्यावर भर, पालकांचेही मिळते सहकार्य

‘स्थलांतरीत’ विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी धुळे जिल्ह्यातील चारणपाडा शाळा
आॅनलाइन लोकमत
शिरपूर (जि.धुळे) : तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगात मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर सांगवी बीट व पळासनेर केंद्रातंर्गत येणारी जिल्हा परिषदेची चारणपाडा येथील शाळा स्थलांतरीत विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य मोठ्या मेहनतीने करीत आहेत, नवीन ओळख निर्माण करीत आहे़
अवघ्या हजार-बाराशे लोकसंख्येचे, आदिवासी, चारण, भरवाड वस्तीचे चारणपाडा गाव आहे. जन्मजात गोपालनाचा वसा घेतलेली कुटुंब, त्यानिमित्त स्थलांतर अटळ आहे. कुटुंबाचे कुटुंब स्थलांतरीत होत असतात़ ते देखील दुसऱ्या जिल्ह्यात़ कुटुंबाच्या स्थलांतरामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळा बालरक्षक भूमिकेतून नियोजन करीत असते़ राज्यशासनाच्या उपक्रम बालरक्षक मोहिम यातून यशस्वी करण्याचा शाळेचा प्रयत्न असतो़ स्थलांतरीत कुटुंबे नेमके कोणत्या गावी जातात याची माहिती काढल्यानंतर बालरक्षकातर्फे त्या विद्यार्थ्यांना हमीकार्ड दिले जाते़ तो विद्यार्थी शाळेत नियमित जाताहेत किंवा कसे याचा आढावा घेतला जातो़ जेणेकरून स्थलांतरीत मुलांचे वर्ष वाया जात नाही, शिक्षणात देखील खंड पडत नाही़ शाळा व समाज हा अनुबंध टिकून ठेवल्यामुळे गवाला देखील आपलीच शाळा वाटते़ मुलांना दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदान, खासगी शाळांनाही लाजवेल असा परिसर तसेच शाळा म्हणजे सर्वांगीण विकास साधणारी शाळा आहे.फक्त तालुक्यात सांगवी बिटमध्येच जॉय फूल लर्निंग हा उपक्रम शिक्षण विस्तार अधिकारी डॉ़नीता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे़ या उपक्रमात परसबाग प्रत्येक शाळेला अनिवार्य असून शालेय व्यवस्थापन समितीच्या देखरेखीखाली सज्ज आहे़ परसबागेतील भाजीपाला निघायला सुरूवात झाल्यावर तो शाळेतीलच पोषण आहारांमध्ये मुलांना दिला जाणार आहे़