यश संपादनासाठी बदल स्वीकारणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:26+5:302021-09-07T04:43:26+5:30
शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी.पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांच्या हस्ते रसायनशास्त्र मंडळाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले, तसेच शिक्षक ...

यश संपादनासाठी बदल स्वीकारणे आवश्यक
शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी.पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांच्या हस्ते रसायनशास्त्र मंडळाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले, तसेच शिक्षक दिवसानिमित्त मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी प्राचार्य डॉ.पवार बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.व्ही.एस.पवार, विभाग प्रमुख तथा रसायनशास्त्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.व्ही.टी.पाटील, सचिव प्रा.डॉ.पी.एस.गिरासे, मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.व्ही.बी.जाधव, प्रा.डॉ.एस.एल.सोनवणे, प्रा.डॉ.एस.एस.पाडवी, प्रा.सौ.एस.एस.डंबीर, प्रा.मृणाल मोरे व विद्यार्थी या ऑनलाइन कार्यक्रमात उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.पवार पुढे म्हणाले की, विद्यापीठाच्या नियमित अभ्यासाबरोबर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, त्यात विद्यार्थ्यांनी नियमित सक्रियपणे सहभागी होऊन डोळसपणे स्वतःचा विकास साधला पाहिजे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल विशेष आदर असला पाहिजे. परिस्थितीतून प्रत्येकाने शिकले पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी संधी मिळाल्यावर, प्रत्येकाने आपले विचार मांडण्यासाठी पुढे आले पाहिजे. विद्यार्थ्यांची झालेली प्रगती शिक्षकांसाठी सर्वात मोठा सन्मान व समाधान आहे. विद्यार्थी शिकून चांगला नागरिक व्हावा, हीच आमची इच्छा. समाज व्यवस्था चांगली असण्यासाठी कुटुंब व्यवस्था चांगली असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने चांगले आत्मचरित्र वाचले पाहिजे, त्यातील यशस्वी व्यक्तीने प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून संपादन केलेले यश आपल्याला प्रेरणा देते.
उपप्राचार्य व्ही.एस.पवार म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडील हे प्रथम गुरू आहेत. शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांसाठी चांगले करण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्यात चांगली शिकवण देणारा प्रत्येक व्यक्ती आपला गुरूच असतो. सत्य व प्रामाणिकपणा हे आपल्या जीवनातील दोन पैलू असून, विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी नेहमीच त्यांचे आचरण केले पाहिजे.
विभाग प्रमुख डॉ.व्ही.टी. पाटील म्हणाले की, आपल्या संपूर्ण देशात भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा दिवस आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे विभागातर्फे धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, सचिव डॉ.पी.एस.गिरासे यांनी मंडळाचे उद्दिष्टे सांगून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा व त्यांना रसायनशास्त्र विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी आयोजित केले जाणारे उपक्रम व नेट-सेट परीक्षांच्या तयारीसाठी दिले जाणारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पाटील हिने केले, तर उपस्थितांचे आभार हर्षदा कुलकर्णी हिने केले. यावेळी निखिल बोरसे, कामिनी पाटील, मयूर पाटील तुषार पाटील, हर्षदा खैरनार यांनी गुरुजनांबद्दल कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी द्वितीय वर्ष एमएससी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले