यंदाची दिवाळी साध्या पध्दतीने साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 21:09 IST2020-11-07T21:09:21+5:302020-11-07T21:09:21+5:30
कोरोना विषाणूचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही

यंदाची दिवाळी साध्या पध्दतीने साजरा करा
धुळे : जिल्ह्यात गेल्या एप्रिलपासून सुरू झालेले कोरोना विषाणूचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. या विषाणूच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गडद होत आहे. अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दिवाळीचा सण राज्य शासनाच्या नियमांचे पालन करीत घरगुती वातावरणात आणि साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, मनपा आयुक्त अजिज शेख यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या कालावधीत यापूर्वी आलेले सर्वधर्मीय सण, उत्सव नागरिकांनी घरगुती वातावरणात आणि साध्या पध्दतीने साजरे केले आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिवाळीच्या सणात नागरिकांनी अशाच प्रकारचे सहकार्य करावे. नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे. जेणेकरून कोरोना विषाणूची साखळी खंडित करणे शक्य होईल.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बंद असलेली धुळे जिल्ह्यातील धार्मिकस्थळे अद्याप खुली झालेली नाहीत. त्यामुळे दिवाळीचा सण नागरिकांनी घरगुती स्वरुपात आणि मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बालके घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी गर्दी करणे टाळावे.
घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर अवश्य करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जेणेकरून कोरोना विषाणूचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण होय. या उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली जाते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. या प्रदूषणाचा नागरिक आणि प्राण्यांवर विपरित परिणाम होतात. कोरोना विषाणूमुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होवून त्रास होण्याची भीती आहे. त्यासाठी सावधगीरी बाळगावी असेही जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले.