प्रजासत्ताक दिन कोरोना विषाणूबाबतच्या नियमांचे अनुपालन करून साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:12+5:302021-01-16T04:40:12+5:30
प्रजासत्ताकाच्या ७१व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या नियोजनासाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी ...

प्रजासत्ताक दिन कोरोना विषाणूबाबतच्या नियमांचे अनुपालन करून साजरा करा
प्रजासत्ताकाच्या ७१व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या नियोजनासाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यादव बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, अपर तहसीलदार संजय शिंदे शिक्षणाधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने दरवर्षी होणारे संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात येईल. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळा होईल. महानगरपालिकेने जिल्हा क्रीडा संकुलातील प्रवेशद्वाराशी थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर उपलब्ध ठेवावा, तसेच ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी परिसर सॅनिटाइझ करावा. ध्वजारोहण सोहळ्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक राहील. वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन विविध स्पर्धांचे आयोजन करावे. पोलीस विभागाने आवश्यक बंदोबस्त तैनात करावा. महानगरपालिकेने स्वच्छता ठेवावी. आरोग्य विभागाने प्रथमोपचार साहित्यासह रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. याशिवाय प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी समन्वयातून चोखपणे पार पाडावी, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या तयारीची सविस्तर माहिती दिली.