संवेदनशील भागासाठी ‘सीसीटीव्ही’! खरोखरच प्रश्न निकाली निघेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 21:58 IST2020-02-01T21:58:19+5:302020-02-01T21:58:45+5:30
पोलीस प्रशासन। अत्याधुनिक वाहनांसह साधनांची आवश्यकता, दखल घेण्याची गरज

संवेदनशील भागासाठी ‘सीसीटीव्ही’! खरोखरच प्रश्न निकाली निघेल का?
धुळे : धुळे शहरात वारंवार निर्माण होणारा तणाव लक्षात घेता उशिरा का असेना संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा विषय आता पटलावर आला आहे़ पण, ते लावून प्रश्न सुटणार का? हा मात्र प्रश्न अनुत्तरीतच आहे़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे क्रमप्राप्त ठरेल़ पोलिसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध करुन देण्याची नितांत आवश्यकता आहे़
धुळ्यात २००८, २०१३ मध्ये झालेल्या दोन गटाच्या तणावानंतर उसळलेली दंगल लक्षात घेता यापुर्वीच जिल्हा नियोजन मंडळाच्या पटलावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा विषय चर्चेत आला होता़ मंडळाने तात्काळ परवानगी देऊन संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात हे कॅमेरा लावण्याचे नियोजन देखील करण्यात आले होते़ यानंतर अधिकारी आणि पदाधिकारी बदलले, सत्ता परिवर्तन झाली़ तरीही हा विषय केवळ मंजुरीच्या आणि प्रस्ताव सादर करण्याच्या पायरीवरच आहे़
बुधवारी धुळ्यात उसळलेल्या दंगल प्रकरणी पुन्हा हाच विषय प्रशासनाच्या पटलावर आला़ पालकमंत्र्यांनी तातडीने या कामांसाठी ५ कोटींची विशेष तरतूद देखील करुन दिली़ आता हा प्रश्न कधी मार्गी लागणार हे मात्र आजही गुलदस्त्यातच आहे़ केवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवून प्रश्न सुटणार आहेत का? संवाद आणि नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेऊन त्यातून मार्ग काढायला हवा़
सद्याच्या परिस्थितीत पोलिसांकडे असलेली वाहनांची काय स्थिती आहे, हे जाणून घेत अत्याधुनिक अशी किमान ३० ते ३५ वाहने उपलब्ध करुन द्यायला हवीत़ शिवाय अन्य सामुग्री देखील उपलब्ध झाल्यास अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी यंत्रणा सज्ज होऊ शकेल़
काळानुरुप बदल हवाच
पुर्वीच्या आणि आत्ताच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये अमुलाग्र बदल होत असल्याचे चित्र दिवसेंदिवस समोर येत आहे़ त्यांचा बिमोड करण्यासाठी धुळे पोलीस त्या तुलनेत समक्ष असणे गरजेचे आहे़ त्यात इंटरनेट, संगणकासह अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची गरज व्यक्त होत आहे़