सावधान, १३ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !धुळे शहरात शुध्द पाणी : ग्रामीणमध्ये २० नमुने दूषित, उपाययोजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:28+5:302021-07-14T04:41:28+5:30
धुळे : जिल्ह्यातील १३ गावांचे २० पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले असून हे पाणी आजाराचे कारण ठरू ...

सावधान, १३ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !धुळे शहरात शुध्द पाणी : ग्रामीणमध्ये २० नमुने दूषित, उपाययोजना सुरू
धुळे : जिल्ह्यातील १३ गावांचे २० पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले असून हे पाणी आजाराचे कारण ठरू शकते. त्यामुळे आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणांनी जलशुध्दीकणाच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.
पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी मे, जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यानुसार जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या पथकांनी पाण्याचे नमुने तपासले आहेत.
त्यात धुळे तालुक्यात २५९ नमुने तपासले असून सडगाव येथे २, हेंकळवाडीला २, मोरशेवडी २, जुन्नेर २, गोंदूर ३ असे ११ पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य आले आहेत. साक्री तालुक्यात ३०९ नमुने तपासले असून खैरखुटा येथे २, उमरपाटा (आंबुर), खांडबारा, मचमाळ, जामखेल येथे प्रत्येकी एक असे एकूण ६ नमुने पिण्यासाठी अयोग्य आले. शिदखेडा तालुक्यात १३४ नमुन्यांपैकी होळ, दसवेल, निरगुडी येथील नमुने अयोग्य आले आहेत. तर शिरपूर तालुक्यात २१३ पाणी नमुने तपासले होते. ते सर्वच्या सर्व पाणी नमुने योग्य आले आहेत. शिरपूर तालुक्यात पिण्यासाठी शुध्द पाणी मिळत आहे.
धुळे शहरात शुध्द पाणीपुरवठा
धुळे शहरात सर्वच भागांमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. जून महिन्यात पालिकेच्या पाणी नमुने तपासणी पथकाने विविध भागात नळांना येणारे पाणी आणि जलकुंभातील पाण्याचे ११० नमुने तपासले होते. त्यापैकी सर्व नमुने पिण्यासाठी योग्य आले आहेत. एकही पाणी नमुना दूषित आला नसल्याचे सांगण्यात आले. जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा योग्य आहे. पाण्याचे हे नमुने पावसाळ्याच्या आधी जून महिन्यात घेतले होते. त्यांची तपासणी झाली आहे.
जलजन्य आजारांचा पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळ्याच्या नंतर पाण्याचे नमुने तपासले जातात.
जलशुध्दीकरण केंद्रावरून शुध्द पाण्याचा पुरवठा होत असला तरी जलवाहिनी फुटल्यास पाणी दूषित होऊ शकते.
कोरोनामुळे नमुने घटले नाहीत
nकोरोनाचा संसर्ग असला तरी पाणी नमुने घेण्याचे प्रमाण घटलेले नाही. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संबंधित विभागाने पाण्याचे नमुने घेतले. कोरोनाचा संसर्ग असल्याने पिण्याच्या पाण्याच्या विषयाला जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
nजिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काही ठराविक गावांची निवड करून पाणी नमुने तपासले जातात. पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळल्यास उपाययोजना सुचविल्या जातात.
nपिण्यासाठी अयोग्य पाणी आढळून आल्यास जलस्त्रोतांचे शुध्दीकरण केले जाते.
n संबंधित ग्रामपंचायतींना तशा सूचना देऊन प्रशिक्षण तसेच आवश्यक साहित्य पुरविले जाते.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !
nधुळे शहरासह जिल्ह्याने कोरोनाच्या दोन लाटांमध्ये कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. त्यामुळे आरोग्याचे महत्त्व पटले आहे.
nकोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी पावसाळा लागल्याने जलजन्य आजारांची शक्यता बळावते.
nशुध्द पाण्याचा पुरवठा होत असला तरी पावसाळ्यात पाणी उकळून प्याले तर जलजन्य आजार टाळता येतात.
n धुळे शहरासह जिल्ह्यात अजुनपर्यंत तरी डायरियाचे रुग्ण आढळून आले नाहीत.
nनागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि आरोग्य सांभाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
ज्या गावात तपासणीच झाली नाही त्यांचे काय ?
जिल्ह्यात प्रातिनिधिक स्वरूपात काही ठरावीक गावांमध्ये पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यात जलस्त्रोतांचादेखील अभ्यास केला जातो. सर्वच गावांचे पाणी नमुने तपासले जात नाहीत.
त्यामुळे ज्या गावात तपासणीच झाली नाही त्या गावांच्या सार्वजनिक आरोग्याचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतात. त्यांचा हा प्रश्न रास्त आहे.
शिवाय दरवर्षी त्याच त्या गावांमध्ये पाण्याची तपासणी होते. इतर गावांमध्येदेखील तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी आहे. आरोग्याच्या तक्रारी आल्यास इतर गावांमध्ये तपासणी केली जाते.