काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:13 IST2020-08-04T22:13:22+5:302020-08-04T22:13:44+5:30
शिरपूर : ग्रामस्थांनी ठेवली पाळत, पंचायत समिती सदस्यासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला
शिरपूर : तालुक्यातील पळासनेर येथील एका रेशनदुकानदाराने काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी गहू भरलेला ट्रॅक्टर गावातच एका दुकानावर विक्री करतांना रंगेहात सापडला़ दरम्यान, जोपर्यंत तहसिलदार घटनास्थळी येत नाही तोपर्यंत तो ट्रॅक्टर उभाच होता़ ते आल्यावर त्यांनी गुन्हा नोंद करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गहू पकडून देणारे रात्री उशिरा घरी गेलेत़ या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मानसिंग केऱ्या पावरा (बिलाडा) हा शिरपूर पंचायत समिती सदस्य आहे़
३ आॅगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पळासनेर येथील रेशन दुकानदार एम़ के़ पावरा यांचे दुकान क्रमांक १५९ च्या मागील बाजूच्या एका घरातून धान्यसाठा एका रिक्षामधून घेवून जात असल्याची माहिती गावातील तरूणांना मिळाली़ काही वेळानंतर पुन्हा एमएच १८ बीसी ४८११ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये गव्हाचे कट्टे भरून ते गावामधीलच गणपत भवरलाल जाट यांचे किराणा दुकान येथे आणून उभे करण्यात आले़ त्यावेळी रेशनदुकानदार पावरा यांचा मुलगा किसन पावरा व राहुल पावरा हे दोघे किराणा दुकानावर येवून रेशनचा गहू विक्री करीत असतांना अचानक पाळत ठेवलेले तरूणाई व ग्रामस्थ त्या किराणा दुकानावर येवून धडकलेत़ सदरचा गव्हाचा साठा हा रेशनिंगचा असल्याची कबुली त्या दोघे बंधूंनी दिली़
त्यामुळे उपस्थितांनी ट्रॅक्टर चालकास पकडून ठेवले़ त्याच्याकडून सदरचा गहू कुणाचा आहे, रेशनदुकानदार एमक़े़पावरा, ट्रॅक्टर चालक यकीन शिलदार पावरा तर ट्रॅक्टरचा मालक अजय सुकदेव कोळी असल्याची कबुली मोबाईलमध्ये कैद केली़
ट्रॅक्टरमध्ये ५० गव्हाचे कट्टे अंदाजित २३ क्विंटल गव्हाची किंमत ४६ हजार तर ट्रॅक्टरची किंमत २ लाख रूपये असे एकूण २ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ पुरवठा निरीक्षक अपर्णा वडूरकर यांनी फिर्याद दिली़ रेशन दुकानदार मानसिंग केºया पावरा, किसन मानसिंग पावरा, राहुल पावरा, ट्रॅक्टर मालक अजय सुकदेव कोळी, चालक यकीन शिलदार पावरा व किराणा दुकानदार गणपत भवरलाल जाट या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिकारी येत नाही, तोपर्यंत तरुणांचे ठिय्या आंदोलन
संबंधित रेशन दुकानदार पावरा हे गावातील ग्रामस्थांना दरमहा धान्याचा साठा देत नव्हते, त्यामुळे तरूणाईने त्यांच्यावर पाळत ठेवली होती़ गावातील लाभार्थी धान्य साठा पासून वंचित राहून हा गहू परस्पर काळ्या बाजारात विकला जात होता़ या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई केली जात नव्हती अशी ओरड उपस्थितांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली़ रेशनदुकानदार पावरा यांचे रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे़