लसीकरण मोहीम गतिमान पद्धतीने राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:01+5:302021-05-05T04:59:01+5:30
धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील कोरोना हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. ...

लसीकरण मोहीम गतिमान पद्धतीने राबवा
धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील कोरोना हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या उपस्थितीत धुळे तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल आणि ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आल्हा आणि धुळे तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
कोरोनाग्रस्तांवर हलगर्जी न करता उपचार करून त्यांना तंदुरस्त करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करण्याच्या सूचना दिल्या. डॉक्टर, तसेच सहयोगी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असून, त्यांची संख्या वाढविण्यासाठी त्वरित शासनस्तरावर प्रयत्न करील असे सांगितले. धुळे तालुक्यातील १० गावे धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने त्या गावातील रहिवाशांनाही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महानगरपालिका रुग्णालयात लसीकरण करण्यात यावे. बैठकीत आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाबाबत आढावा घेतला. त्यात धुळे तालुक्यातील ११ प्राथमिक केंद्रांत एकूण २९ हजार ४१९ जणांना आतापर्यंत लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले.
११ अॅॅम्ब्युलन्स खरेदी प्रस्ताव- आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या आमदार निधीतून कोविड काळात रुग्णांना उपयोगी पडावी म्हणून अॅम्ब्युलन्स खरेदीचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, तेवढ्या अॅॅम्ब्युलन्स खरेदीचा प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाला पाठवावा आणि लवकरात लवकर अॅॅम्ब्युलन्स खरेदी करण्याच्याही सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीला धुळे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी रवंदळे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, मुख्य प्रशासक रितेश पाटील, खरेदी-विक्रीचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते साहेबराव खैरनार, पं.स. गटनेते पंढरीनाथ पाटील, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, वलवाडी माजी सरपंच भटू चौधरी, संचालक संतोष राजपूत, बापू खैरनार, पं.स. सदस्य गणेश जयस्वाल, रावसाहेब पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.