धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयास कार्डिक अॅम्बुलन्सची अद्यापही प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 11:37 IST2019-08-22T11:36:58+5:302019-08-22T11:37:16+5:30
घोषणेची पूर्तता नाही : रूग्णांचे वाचू शकतील प्राण

धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयास कार्डिक अॅम्बुलन्सची अद्यापही प्रतीक्षाच
आॅनलाइन लोकमत
धुळे : येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी व्हेंटीलेटर असलेल्या रूग्णवाहिका (कार्डिक अॅम्बुलन्स) दोन महिन्यात उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अटल महाआरोग्य शिबिरा’च्या उदघटनाप्रसंगी केली होती. या गोष्टीला आता वर्ष होणार आहे. मात्र कार्डीक अॅम्बुलन्सला अद्याप शासनाने मंजुरीच दिली नसल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. त्यामुळे कार्डिक अॅम्बुलन्सची अजुनही प्रतीक्षाच आहे.
धुळे हे तीन राष्टÑीय महामार्ग तसेच तीन राज्याच्या सीमेवर असलेले महत्वाचे शहर आहे. खान्देशासह परिसरातील गुजरात, मध्यप्रदेशातील रूग्णही हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येत असतात. मात्र अतिगंभीर रूग्णांना नाशिक, औरंगाबाद येथे न्यायचे असल्यास त्यांना साध्या रूग्णवाहिकेतून न्यावे लागते. साध्या रूग्णवाहिकेत आॅक्सिजनची व्यवस्था नसते. त्यामुळे गंभीर रूग्णांसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी व्हेंटीलेटर असलेल्या रूग्णवाहिकेची नितांत गरज आहे. येथे येणाऱ्या रूग्णांची संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ सप्टेंबर २०१८ रोजी धुळ्यात झालेल्या अटल महाआरोग्य शिबिरात हिरे शासकीय महाविद्यालयासाठी व्हेंटीलेटर असलेल्या दोन सुसज्ज रूग्णवाहिका दोन महिन्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. आता या गोष्टीला पुढील महिन्यात एक वर्ष होईल. या कार्डीक अॅम्बुलन्सला शासनाने अद्याप मंजूरी दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा पूर्ण करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.
व्हेंटिलेटरयुक्त रूग्णवाहिकेसाठी मंजुरी का मिळाली नाही याचा शोध घेणे गरजेचे आहे.