वाझे वापरत असलेली कार धुळ्याचीच, पण ती फेब्रुवारीमध्ये विकली गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 15:30 IST2021-03-17T15:30:29+5:302021-03-17T15:30:55+5:30
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण : कारचे आधीचे मालक सारांश भावसार यांनी दिलेली माहिती

वाझे वापरत असलेली कार धुळ्याचीच, पण ती फेब्रुवारीमध्ये विकली गेली
धुळे : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण चांगलेच गाजत आहे. एनआयएने जप्त केलेली सचिन वाझे वापरत असलेली कार ही धुळ्याची निघाली आहे. वस्तुत: ही कार फेब्रुवारी २०२१ मध्येच विकली गेली आहे. या कारचा माझा काही संबंध राहिलेला नाही, अशी माहिती त्या कारचे आधीचे मालक सारांश भावसार यांनी दिली. दरम्यान, तपासाचा भाग असल्यामुळे अधिकृत माहिती देवू शकत नाही अशी भूमिका प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी व्यक्त केली़
सचिन वाझे यांच्याकडून तपासासाठी एनआयए यांच्या पथकाने ताब्यात घेतलेली एमएच १८ बीआर ९०९५ क्रमांकाची मर्सिडीज कार ही धुळे पासिंगची असल्याचे उघडकीस आले आहे. ही कार धुळ्यातील उद्योजक सारांश भावसार यांची होती. त्यांनी ही कार आपल्या आईच्या नावाने २०१९ मध्ये खरेदी केली होती. त्यानंतर भावसार यांनी ही कार फेब्रुवारी २०२१ मध्ये ‘कार २४’ या आॅनलाईन कंपनीला विकली होती. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काही संबंध राहिलेला नाही अशी भूमिका कारचे आधीचे मालक सारांश भावसार यांनी व्यक्त केली. याप्रकरणी जर काही माहिती तपास यंत्रणेला पाहिजे तर मी निश्चित सहकार्य करेल असेही भावसार यांनी सांगितले.
अद्याप विचारणा नाही : आरटीओ
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत जी कार सापडली आहे ती धुळ्याची असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरुन चौकशी सुरु असल्याने यासंदर्भात अधिक माहिती देवू शकत नाही. वरिष्ठ पातळीवरुन अथवा पोलिसांकडून विचारणा झाली तरच त्यांना माहिती देता येईल. तुर्ततरी तपासाचा भाग असल्यामुळे कारसंदर्भातील अधिकृत माहिती देता येऊ शकत नाही़ अशी भूमिका प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़