बंदिवानाच्या खिशात आढळला गांजा, तंबाखू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:59 IST2020-05-25T20:58:19+5:302020-05-25T20:59:48+5:30
दरोडा प्रकरणातील आरोपी : गुन्हा दाखल

बंदिवानाच्या खिशात आढळला गांजा, तंबाखू
धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य तपासणी करीता नेलेला शिक्षाबंदीवान कारागृहात परतल्यानंतर त्याच्याजवळ गांजा आणि तंबाखूची पुडी आढळून आली़ पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करुन हा प्रकार केल्याचे तपासणीतून समोर आल्याने त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
दरोडा प्रकरणातील संशयित संतोष चंद्रकांत शिंदे याच्या विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात २०१७मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल आहे़ याप्रकरणी न्यायाधीशांनी त्याला ७ वर्षाची शिक्षा ठोठावली असून सध्या तो धुळे कारागृहात शिक्षा भोगत आहे़
कोरोना विषाणुची लागण झाल्याची शक्यता लक्षात घेऊन त्याला २४ मे रोजी सकाळी ८ वाजता हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी नेण्यात आले़ तेथून परतल्यानंतर कारागृहात केलेल्या तपासणीत त्याच्याकडे १०९ रुपयाचा गांजा, तंबाखु आढळून आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी भरत करपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला़