मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:43+5:302021-03-27T04:37:43+5:30
धुळे - जिल्ह्यात पुढील तीन दिवस पुरतील एवढ्याच कोरोना लस शिल्लक असून साडे पाच लाख लसींची मागणी आरोग्य विभागाने ...

मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा
धुळे - जिल्ह्यात पुढील तीन दिवस पुरतील एवढ्याच कोरोना लस शिल्लक असून साडे पाच लाख लसींची मागणी आरोग्य विभागाने केली आहे. वेळेत लस प्राप्त झाल्या नाहीत तर लसीकरण मोहिमेला खोडा बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६५ हजार ३७४ नागरिकांनी लस टोचून घेतली आहे. ५८ हजार ८७ जणांनी कोरोनाचा पहिला डॉस घेतला आहे. तर ७ हजार २८७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सध्या जिल्हास्तरावर लसीचा एकही डोस शिल्लक नाही. मात्र जिल्ह्यातील ६३ लसीकरण केंद्रांकडे एकूण १५ हजार डोस उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ग्रामीण भागातही आठवड्यातून तीन दिवस लसीकरण सुरु करण्यात आले आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार हे तीन दिवस आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण केले जाते. ज्या दिवशी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर लसीकरण होते तेव्हा लसीकरणाचे प्रमाण वाढते. सरासरी ५ हजार डोस तेव्हा लागतात. सध्या केवळ १५ हजार डोस शिल्लक असल्यामुळे केवळ तीन दिवस पुरतील एवढ्याच लस शिल्लक आहेत. तात्काळ लस उपलब्ध झाल्या नाहीत तर लसीकरणाला खोड बसू शकतो. तसेच १ एप्रिल पासून ४५ वर्षावरील सर्वाना लस देण्यात येणार असल्याने साडेपाच लसींची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे.
४५ वर्षावरील ४ लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण -
१ एप्रिल पासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ व्याधी असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांना लस घेता येत होती. मात्र १ एप्रिल पासून सर्वाना लस घेता येणार आहे. जिल्ह्यात ४५ वर्षावरील सुमारे लाख नागरिकांना या टप्प्यात लास दिली जाणार असल्याने आरोग्य यंत्रणेची कसोटी लागणार आहे.
साडेपाच लाख लसींची मागणी नोंदवली -
जिल्ह्यात कोरोना लसींचा मोजका साठा सध्या शिल्लक आहे. केवळ १५ हजार लस शिल्लक आहेत. तसेच १ एप्रिल पासून ४५ वर्षावरील सर्व नागरिक लस घेऊ शकणार आहेत. त्यामुळे साडेपाच लसींची मागणी करण्यात आली आहे. डोस वेळेत मिळाले तर लसीकरणात खंड पडणार नाही अन्यथा डोस अभावी जिल्ह्यातील लसीकरण बंद पडू शकते.
पुरवठ्याप्रमाणे लसीकरण -
४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजन केले असून शासनाकडे साडे पाच लाख डोसची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे पुरवठा होईल त्याप्रमाणे लसीकरण केले जाईल. लसींचे डोस वेळेत उपलब्ध होतील व पुरेसे डोस मिळतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वेळेत लस उपलब्ध होतील व लसीकरण बंद करावे लागणार नाही असा विश्वास आहे.
- डॉ संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी