दस्तावेज तपासणी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:08 IST2020-02-10T23:08:00+5:302020-02-10T23:08:31+5:30
साखळी उपोषण: धुळे जिल्ह्यातील अपंग समावेशित विशेष शिक्षक आक्रमक

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अपंग समावेशित विशेष शिक्षक आक्रमक झाले असून सोमवारपासून त्यांनी तीन दिवसीय साखळी उपोषण सुरू केले आहे़
अपंग समावेशित शिक्षक व परिचर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय भामरे यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालया जवळ उपोषण सुरू आहे़ मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे़
२७ जानेवारीपासून सुरू केलेली विशेष शिक्षक दस्तावेज तपासणी रद्द करावी, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनाला सादर केलेल्या समायोजन प्रस्तावावर कार्यवाही करुन अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत कार्यरत सन २००९ नंतर नियुक्त विशेष शिक्षक व परिचर यांचे शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील रिक्त पदे समायोजन करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करावा, विशेष शिक्षक व परिचर यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, शिक्षण संचालकांच्या पत्रान्वये शिक्षणाधिकाऱ्यांना वळते केलेले वेतन फक्त विशेष शिक्षकांची उपस्थिती ग्राह्य धरुन तात्काळ राज्यातील लाभार्थी विशेष शिक्षकांना अदा करावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़
विशेष शिक्षकांची दस्तावेज तपाासणी रद्द होत नाही आणि समायोजनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत धुळे जिल्ह्यातील विशेष शिक्षकांचे आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष पंकज चौधरी, प्रदेश सरचिटणीस गिरीष महाले, महिला संघटक मनिषा पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष राकेश बोरसे, धुळे ग्रामीण तालुकाध्यक्ष तेजस सोनवणे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष विजेंद्र सूर्यवंशी, साक्री तालुकाध्यक्ष दिनेश देवरे, शिरपूर तालुकाध्यक्ष केशव पाटील, सागर ठाकूर, विशाल पाटील, प्रशांत बच्छाव, उज्वला पाटील, सारिका पाटील, राजश्री गिते, सारिका खैरे, कृष्णा अहिरे यांच्यासह विशेष शिक्षकांनी केली आहे़ आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अपंग समावेशित विशेष शिक्षक आक्रमक झाले आहेत़ आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे़