Busted by thieves in the city | शहरात चोरट्यांनी मांडला उच्छाद
शहरात चोरट्यांनी मांडला उच्छाद

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात चार ठिकाणी चोरट्यांनी हजारो रुपयांवर डल्ला मारला़ पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तीन मेडीकल दुकानांसह एका गॅस एजन्सीला लक्ष केले़ एकाच दिवसात चोरीच्या चार घटना घडल्यामुळे त्यांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे़ 
गेल्या आठवड्यांपासून शहरात कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत़ साक्री रोडवरील कुमारनगर भागात एका पाठोपाठ एक याप्रमाणे सलग दोन दिवस चोरट्यांनी उच्छाद मांडत लाखों रुपये लंपास केले़ त्यानंतर अग्रवाल नगर भागात मिरचीची पूड डोळ्यात फेकून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली रोकड ही दुचाकीसह चोरुन नेल्याची घटना ताजी असताना रविवारी पहाटे पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ एकाच दिवसात ३ मेडीकल दुकान आणि एक गॅस एजन्सी फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले़ 
सोना मेडीकल
शहरातील आग्रा रोडवरील रामवाडी समोरच सोना मेडीकल आहे़ या मेडीकल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत चोरट्याने सुमारे ७ हजार ५०० ते १० हजाराचा ऐवज लंपास केला़ चोरीची ही घटना सकाळी उजेडात आली़ 
अर्चना मेडीकल
शहरातील आग्रा रोडवरच गणपती पॅलेस जवळ अर्चना मेडीकल आहे़ या मेडीकल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत चोरट्याने रोकड लंपास केली़ चोरीची ही घटना सकाळी उजेडात आली़
न्यू सेवा मेडीकल 
शहरातील लेनिन चौकात न्यू सेवा मेडीकल दुकान आहे़ अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या मेडीकल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत चोरट्याने सुमारे ७० हजाराचा ऐवज लंपास केला़ चोरीची ही घटना सकाळी उजेडात आली़
पोलीस तातडीने दाखल
चोरीच्या या घटनांची माहिती एका पाठोपाठ मिळत गेल्याने पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांच्यासह शहर पोलिसांचे पथकाने देखील चोरीच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली़ स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी देखील तातडीने घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली़ घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ 
एकलव्य गॅस एजन्सीवर डल्ला
धुळे : शहरातील ८० फुटी रोडवर अग्रसेन चौकात के़ डी़ मिस्तरी कॉम्प्लेक्समध्ये एकलव्य गॅस एजन्सी आहे़ ही एजन्सी चोरट्याने फोडली आणि गल्यातील रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़ घटनेची माहिती मिळताच श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते़  घटनेचे वृत्त पसरल्यानंतर याठिकाणी गर्दी जमा झाली होती़ याप्रकरणी एकलव्य गॅस एजन्सीचे व्यवस्थापक दिनेश प्रभाकर चौधरी (रा़ प्रमोद नगर, देवपूर) यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दुपारी फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, चोरट्यांने एजन्सीचे शटर तोडून आत प्रवेश करीत २५ हजार रुपये रोख लंपास केले़ याप्रकरणी भादंवि कलम ४५७, ३८०, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ 
दरोड्या होती चर्चा
अग्रसेन चौकात असलेल्या एकलव्य गॅस एजन्सीच्या येथे चार ते पाच जण हातात शस्त्र घेऊन आले़ त्यांनी वॉचमनला पिस्तूलचा धाक दाखविला़ त्याला मारहाण करीत एजन्सी फोडली आणि रोकडसह कागदपत्र घेऊन पोबारा केल्याची चर्चा सकाळपासून सुरु होती़ मात्र या चर्चेला पोलिसांनी नकार दिला़ 

Web Title: Busted by thieves in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.