धुळे विभागात प्रवाशांची संख्या घटल्याने बस फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:49 IST2020-03-18T11:49:36+5:302020-03-18T11:49:56+5:30
एस.टी.च्या उत्पन्नावर होतोय परिणाम, चैत्रोत्सवानिमित्त जादा बस सोडण्यात येणार नाहीत

धुळे विभागात प्रवाशांची संख्या घटल्याने बस फेऱ्या रद्द
आॅनलाइन लोकमत
धुळे : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता बहुतांशजण आपल्या गावातच थांबणे पसंत करीत आहेत. अनेकांनी प्रवास टाळणे सुरू केले आहे. परिणामी बसस्थानकावर नेहमीप्रमाणे दिसणारी गर्दी आता कमी झालेली आहे. प्रवाशांची गर्दी कमी झाल्याने, धुळे विभागाच्या एकाच दिवसात तब्बल ५४६ फेºया रद्द कराव्या लागल्याने साडेपाच लाखांचे नुकसान सोसावे लागले.
गेल्या दीड महिन्यापासून जगात ‘कोरोना’ विषाणूने धूमाकूळ घातलेला आहे. आता महाराष्टÑातही ‘कोरोना’चे संशयित रूग्ण आढळल्याने शासन सतर्क झालेले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यात्रा,उत्सव, मेळावे रद्द करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. याचा सर्वाधिक फटका मात्र एस.टी. महामंडळाला बसू लागला आहे.
धुळे हे तीन राज्याच्या सीमेवरील गाव आहे. येथुन राज्याच्या कानाकोपºयात जाण्यासह गुजरात, मध्यप्रदेशमध्ये बसने जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे दिवसभर धुळे बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले असते. मात्र ‘कोरोना’मुळे अनेकजण गावात, घरातच थांबणे पसंत करीत आहेत. त्याचा परिणाम प्रवाशी संख्येवर झालेला आहे.
प्रवाशी संख्या कमी झाल्याने एस.टी.महामंडळाच्या धुळे विभागालाही बसफेºया रद्द कराव्या लागल्या आहेत. १६ मार्च रोजी धुळे विभागाच्या ५४६ फेºया कमी करण्यात आल्या. त्यात धुळे आगाराच्या २८, साक्रीच्या १३४, शहाद्याच्या १९४, शिरपूरच्या १०८, अक्कलकुवाच्या ३६, शिंदखेड्याच्या २२ व दोंडाईचा आगाराच्या २४ अशा एकूण ५४६ बसफेºया रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विभागाचे तब्बल ५ लाख ३७ हजार ८०१ रूपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान यात्रा,मेळावे, आठवडे बाजार, शाळा ३१ मार्चपर्यंत बंद असल्याने, बसफेºया रद्द होण्याचे व उत्पन्न घटण्याचे प्रमाण अजून वाढू शकते असा अंदाज आहे. आगामी १५ दिवसात धुळे विभागाचे कोट्यावधीचे उत्पन्न बुडू शकते.