देवपुरातील नयना कॉलनीत घरफोडी, लाखोंचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:43 IST2021-09-04T04:43:01+5:302021-09-04T04:43:01+5:30
देवपुरातील नकाणे रोडवरील शिक्षक कॉलनीच्या समोर नयना कॉलनीत दीपक भिकन पाटील यांचे निवासस्थान आहे. ते आर्मीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ...

देवपुरातील नयना कॉलनीत घरफोडी, लाखोंचा ऐवज लांबविला
देवपुरातील नकाणे रोडवरील शिक्षक कॉलनीच्या समोर नयना कॉलनीत दीपक भिकन पाटील यांचे निवासस्थान आहे. ते आर्मीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते आपल्या परिवारासोबत बाहेरगावी गेले होते. परिणामी २७ ऑगस्टपासून त्यांचे घर बंद होते. बंद असलेल्या घराचा चोरट्याने फायदा उचलला. त्यांच्या घराला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त करीत कपाटही फाेडले. त्यात ठेवलेले दीड लाखांची रोकड, ७ ते ८ तोळे सोने, चांदीचे शिक्के असा लाखों रुपयांचा ऐवज चोरुन घेतला. चोरट्याने सुटे पैसे आणि बेन्टेंक्सचे दागिने लांबविले नाही. चोरटे ऐवज घेऊन पसार झाल्यानंतर सकाळी पाटील परिवार घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसून आला. पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ श्वान पथक, ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते. श्वानाने नकाणे रोडवरील किशोर आप्पाच्या मळ्यापर्यंत माग दाखविला. त्यानंतर श्वान तिथेच घुटमळत राहिले. या घटनेची नोंद पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तपास सुरु आहे.