शालेय क्रीडा शिबिरांना कोरोना संसर्गामुळे ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:38 AM2021-05-08T04:38:02+5:302021-05-08T04:38:02+5:30

धुळे - प्रतिवर्षी उन्हाळ्यात खेळाडूंच्या कौशल्यवाढीसाठी शासकीय व संघटना स्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन परीक्षेचा हंगाम संपताच सुरू होते. ...

Break at school sports camps due to corona infection | शालेय क्रीडा शिबिरांना कोरोना संसर्गामुळे ब्रेक

शालेय क्रीडा शिबिरांना कोरोना संसर्गामुळे ब्रेक

Next

धुळे - प्रतिवर्षी उन्हाळ्यात खेळाडूंच्या कौशल्यवाढीसाठी शासकीय व संघटना स्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन परीक्षेचा हंगाम संपताच सुरू होते. यामुळे खेळाडूंचे कौशल्य व कामगिरीतही सुधारणा होते; परंतु गतवर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या शिबिरांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे खेळाडू कौशल्यवाढीच्या चेनला ब्रेकच लागला आहे.

वार्षिक परीक्षेनंतर जिल्हा क्रीडा कार्यालय, विविध क्रीडा संघटना, विविध क्लब आणि अकॅडमीच्या माध्यमातून दीर्घकालीन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिरांतर्गत 30 ते 40 दिवसांचे प्रशिक्षण होत असते. यातून खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेच्या वाढीसह त्या-त्या खेळाच्या कौशल्यवाढीसाठी प्रयत्न केला जातो. या प्रशिक्षण शिबिरातून अनेक खेळाडू आपली कामगिरी उंचावत असतात. वर्षभर खेळण्यायोग्य शारीरिक क्षमता व कौशल्य विकास यातूनच उदयास येत असतो. त्यामुळे अशा प्रशिक्षण शिबिरांची बांधणी अनेक खेळांतून होत असते. कोविड-19 मुळे गतवर्षीही या कालखंडात लाॅकडाऊन होते. त्यामुळे ही शिबिरे झाली नाहीत. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होत असतानाच राज्यात पुन्हा संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे यंदाही नवोदित खेळाडू या शिबिराला मुकणार आहेत. परिणामी खेळाडूंच्या कौशल्य विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. वर्षभर अभ्यास करावा लागत असल्याने खेळाडूंचा दोन सत्रांत नियमित सराव होत नाही. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामुळे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात खेळाडू अधिकाधिक वेळ देऊ शकतात. त्यामुळे अशा शिबिरांना महत्त्व आहे. जिल्ह्यात विविध खेळाच्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. त्यात प्रामुख्याने ॲथलेटिक्स, नेटबॉल, शूटिंगबाॅल, बास्केटबॉल, बाॅक्सिंग, कुस्ती, खो-खो, कबड्डी यासह अनेक खेळांचा समावेश आहे. मात्र, यंदाच्या वर्षातही उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला खेळाडूंना मुकावे लागणार असल्याने खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व पालकांतून चिंता व्यक्त होत आहे.

"क्रीडा विभागाचे दोन प्रशिक्षक"

धुळ्याच्या क्रीडा विभागात खो-खो, कबड्डी व क्रिकेट खेळाचे मिळून दोन प्रशिक्षक आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत या तीन खेळांसोबतच अनेक खेळांचे दरवर्षी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर होते. मात्र, कोरोनामुळे यंदाच्या वर्षी यावर बंधने आली आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धांच्या खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे.

कोरोनामुळे सरावासाठी अडचण....

संचारबंदीमुळे सध्या घरच्या घरीच व्यायाम सुरू आहे. प्रतिवर्षी उन्हाळ्यात प्रशिक्षण शिबिर होतात. मात्र, यंदाच्या वर्षात मैदाने बंद असल्याने अडचण झाली आहे. कौशल्य विकास, आत्मविश्वास वाढीसाठी हे शिबिर उपयुक्त ठरत आहेत. मात्र, कोरोनाने यावर पाणी फेरले.

महेंद्र गावडे, राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू

क्रीडा विकासाची गती संथ होणार...

क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू हा केंद्रबिंदू असतो. खेळाडूंच्या कामगिरीवरच स्पर्धेचा विजेता ठरतो. त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्याला महत्त्व आहे. कौशल्यवाढीसाठी हे शिबिर महत्त्वाचे असून हे शिबिर होत नसल्याने क्रीडा विकासाची गती संथ झाली.

योगेश वाघ, सचिव

धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन, धुळे

खेळ व व्यायाम शारीरिक तंदुरुस्तीचे औषधी काम...

खेळाडूत शारीरिक व मानसिक विकासासोबतच खेळाचे कौशल्य विकसित होऊन तो जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करू शकतो. त्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे असून, शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ व व्यायाम औषधी काम करीत असल्याचे सांगतात.

राहुल एच. पाटील

सचिव-कला व क्रीडा समन्वय समिती, धुळे

प्रशिक्षण शिबिर पायाभरणीचे कार्य करतात

खेळाची ओळख करून देणे, तसेच वैयक्तिक व शारीरिक मानसिक क्षमता वाढीस लावणे, तसेच बौद्धिक क्षमता, एकाग्रता, शिस्त व संघभावना खेळामुळे वाढीस लागते. जीवनात पुढे एखाद्या खेळात स्वतःसह देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ही शिबिरे पायाभरणीचे कार्य करतात. हाच हेतू उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचा असतो.

हेमंत भदाणे, क्रीडाशिक्षक

कै. कमलाबाई छगनलाल अजमेरा हायस्कूल, देवपूर, धुळे.

Web Title: Break at school sports camps due to corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.