दहावीच्या निकालात मुला-मुलींनी साधली बरोबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST2021-07-18T04:26:04+5:302021-07-18T04:26:04+5:30
धुळे : दहावी व बारावीच्या निकालात नेहमीच मुली बाजी मारतात. यंदा मात्र दहावीच्या निकालात मुलांनी मुलींशी बरोबरी साधली आहे. ...

दहावीच्या निकालात मुला-मुलींनी साधली बरोबरी
धुळे : दहावी व बारावीच्या निकालात नेहमीच मुली बाजी मारतात. यंदा मात्र दहावीच्या निकालात मुलांनी मुलींशी बरोबरी साधली आहे. जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ९९.९८ टक्के मुली व ९९.९८ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. शिरपूर येथील एच. आर. पटेल कन्या विद्यालयातील चार विद्यार्थिनींना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. सायली भरत जाधव, नंदिनी दीपक पाटील, नंदिनी युवराज पाटील व अनुष्का अशोक येवले या विद्यार्थिनींना १०० टक्के मिळाले आहेत, तर कमलाबाई कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी पूजा ईश्वर गोसावी हिने ९९.८० टक्के गुण मिळवले आहेत.
जिल्ह्यातील २५ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २५ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९९.९८ टक्के इतका निकाल लागला आहे. केवळ चार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यात दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये नेहमीच मुलींचा टक्का जास्त राहिलेला आहे. यंदा मात्र उत्तीर्ण व अनुत्तीर्ण होण्यात मुले व मुलींनी अनोखी बरोबरी साधली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल लागला आहे. परीक्षा न झाल्यामुळे निकाल कसा लागणार याची पालक व विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. मात्र वेबसाइट सुरू होण्यास व्यत्यय येत असल्याने निकाल पाहता येत नव्हता म्हणून विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. मात्र निकाल पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.
मयूर हायस्कूलचा निकाल १०० टक्के -
देवपूर येथील मयूर हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९४. ८० टक्के गुण मिळवून राज विजय पाटील या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. विद्यालयातील सात विध्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, तर ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६ इतकी आहे.
विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी : राज विजय पाटील ९४. ८० टक्के, तृप्ती विजय शिंदे, ९३.८० टक्के, समर्थ प्रदीप भदाणे ९२ टक्के, सुचित्रा वसंत मासूळ ९०.८० टक्के, दर्शन विनायक भामरे, ९०.२० टक्के जयहिंदच्या १३ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण - देवपूर येथील जयहिंद हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. या विद्यालयातील १३ विध्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. संस्कृती मनोज पाटील या विद्यार्थिनीने ९९.२० टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकवला आहे. तसेच भूमिका प्रसाद जाधव ९८.४० टक्के, हितेशा प्रदीप पाटील ९८.४० टक्के, कनिष्का विलास पवार ९७.८० टक्के यांनी यश मिळविले आहे. विद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
पूजा गोसावी ९९. ८० टक्के मिळवून शहरात अव्वल
येथील कमलाबाई शाळेची विद्यार्थिनी पूजा ईश्वर गोसावी ९९.८० टक्के गुण मिळवून धुळे शहरात अव्वल आली आहे. तिला विज्ञान विषयात १००, तर गणित व संस्कृत या विषयांमध्ये ९९ टक्के गुण मिळाले आहेत. ११वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे डॉक्टर व्हायचे तिचे स्वप्न आहे. शाळा बंद होत्या व परीक्षा रद्द झाली तरी दररोज ८ ते नऊ तास अभ्यास करत होते. परीक्षा रद्द झाली असली तरी गुणांकनाचे निकष योग्य वापरले आहेत. वडील ईश्वर गोसावी व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे पूजाने सांगितले.