दोन दिवस शेतात पडून असलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे केले दफन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:30 IST2020-06-27T22:30:28+5:302020-06-27T22:30:49+5:30
शिरपूर तालुका । तरुणाच्या खिशात आत्महत्या करीत असल्याची सापडली चिठ्ठी

दोन दिवस शेतात पडून असलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे केले दफन
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावालगत एका ऊसाच्या शेतात पुरूष जातीचे कुजलेले प्रेत मिळून आले़ मात्र मयताच्या खिशात कोरोनाच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी सापडल्यामुळे त्याचे शवविच्छेदनासाठी कोणीही पुढे आले नसल्यामुळे अखेर त्याच्या मृतदेहावर शनिवारी सायंकाळी दफनविधी करण्यात आलेला आहे़
गुरुवारी सायंकळी सावळदे येथील शेतकरी समाधान भिका महाजन यांच्या ऊसाच्या शेतात पुरूष जातीचे कुजलेले प्रेत आढळले. माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झालेत़ पोलिसांना कुजलेल्या प्रेताच्या खिशात चिठ्ठी मिळाली.त्यात अजय नावाने कोरोनाच्या त्रासाने त्रस्त झाल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे हिंदी भाषेत लिहिले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आरोग्य विभागाला कळविले़ रात्री ८ वाजेच्या सुमारास खर्दे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ़ मनोज पाटील यांनी घटनास्थळी शवविच्छेदन करता येणार नाही़ सदर कोरोनाग्रस्ताचे शवविच्छेदन धुळ्याला करण्यासाठी पाठवावे लागेल सांगितले. त्यानंतर हे प्रेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत तेथेच पडून होते. त्याठिकाणी दोन पोलीस तैनात होते. यासंदर्भात पोलीस आणि महसूल विभाग एकमेकाकडे बोट दाखवित खो - खो चा खेळ सुरु आहे.
प्रेताची विल्हेवाट लावण्यासंदर्भात पोलिसांना पत्र देण्यात आले. त्यानुसार पोलीस त्याचठिकाणी प्रेताची विल्हेवाट लावणार आहे, असे डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनी सांगितले़
तर, त्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्ट्रीकोनातून दोन पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अनोळखी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली़
मृतदेह नेमका कोणाचा, याची उत्सुकता
उसाच्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर त्याची कुठे ओळख पटते का याची खातरजमा पोलिसांनी दोन दिवस केली होती़ मात्र कोणीही येत नाही आणि त्या मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून शनिवारी सायंकाळी त्याच्यावर दफनविधी केल्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे़ भविष्यात कोणी यासंदर्भात तक्रार केल्यास पुन्हा हे प्रकरण उकरुन निघू शकते़ या दृष्टीने देखील पोलिसांनी काळजी घेतली आहे़ दरम्यान, हा मृतदेह कोणाचा याची उत्सुकता कायम आहे़