'तो' मृतदेह पंकज चव्हाण या तरुणाचा

By Admin | Updated: October 3, 2014 13:08 IST2014-10-03T13:08:03+5:302014-10-03T13:08:03+5:30

जकात नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या एका नाल्याजवळ बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका तरुणाचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला.

The body of Pankaj Chavan, | 'तो' मृतदेह पंकज चव्हाण या तरुणाचा

'तो' मृतदेह पंकज चव्हाण या तरुणाचा

>जळगाव : जकात नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या एका नाल्याजवळ बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका तरुणाचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला. हा मृतदेह संभाजी नगर भागातील पंकज मधुकर चव्हाण (वय-३0) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मयताच्या अवयवांचे नमुने डीएनए तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील जकातनाक्यापासून औद्योगिक वसाहतीकडे जाणार्‍या एका रस्त्यावर एक छोटा नाला आहे. या ठिकाणी बुधवारी एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. मृतदेहाच्या बाजूला निळ्या रंगाची जिन्सची पॅण्ट, राखाडी रंगाचा शर्ट पडलेला होता. पोलिसांनी हे कपडे जप्त केले होते. या कपड्यांच्या आधारे तपासाधिकारी सार्थक नेहेते यांनी मयताची माहिती काढण्यास सुरुवात केली. रामानंद नगर पोलीस स्टेशनला गेल्या २३ सप्टेंबर रोजी एक तरुण हरविल्याची तक्रार दाखल होती. त्या तरुणाच्या नातेवाईकांची भेट नेहेते यांनी घेतली. तसेच जप्त केलेले कपडे त्यांना दाखविले. पोलिसांनी जप्त केलेले कपडे हे पंकज मधुकर चव्हाण (वय-३0) याचे असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
कोण आहे हा पंकज?
पंकज मधुकर चव्हाण हा संभाजी नगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याचे आयटीआयपर्यंत शिक्षण झाले असल्याने तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने कंपनीतील काम सोडलेले होते. त्यामुळे तो घरीच होता. तो घरातून गायब झाल्यानंतर त्याच्या दुसर्‍याच दिवशी कुटुंबीयांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद केली होती. पंकजचे वडील सेल्सटॅक्स विभागातील सेवानवृत्त अधिकारी आहे. कुटुंबात वडिलांसह त्याची आई, एक भाऊ आणि एक बहीण असल्याचे तपासाधिकारी सार्थक नेहेते यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
विषप्रयोग झाला आहे का?
मयत पंकज याचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेला असल्याने त्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला आहे. नातेवाईकांनी त्याची ओळख पटविली असली तरी पोलिसांनी पंकज याच्या शरीरावरील केस, कमरेचा काही भाग, मांडीचे हाड डीएनए तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. या अवयवांसह पोलिसांनी व्हिसेरादेखील तपासणीसाठी पाठविला आहे. मयत पंकज याच्यावर काही विषप्रयोग झाला आहे का? याचा तपास या माध्यमातून लागणार आहे.
खुनाच्या दिशेने तपास सुरू
मयत पंकज याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने डॉक्टरांकडून नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा डॉक्टरांकडून स्पष्ट अभिप्राय मिळत नाही. पंकज याचे दोन्ही पाय दोरीने बांधलेल्या स्थितीत होते. त्यामुळे त्याचा खून झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. तपासाधिकारी सार्थक नेहेते यांनी काही नातेवाईकांची चौकशी करीत तपास सुरू केला आहे. गुरुवारी मयत पंकज याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: The body of Pankaj Chavan,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.