रक्ताचा तुटवडा, लसीकरणाआधी रक्तदान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST2021-05-05T04:58:52+5:302021-05-05T04:58:52+5:30

धुळे : कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा ही आणखी एक गंभीर समस्या बनली असून, लसीकरण करण्याआधी तरुणांनी रक्तदान करावे, असे ...

Blood shortage, donate blood before vaccination | रक्ताचा तुटवडा, लसीकरणाआधी रक्तदान करा

रक्ताचा तुटवडा, लसीकरणाआधी रक्तदान करा

धुळे : कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा ही आणखी एक गंभीर समस्या बनली असून, लसीकरण करण्याआधी तरुणांनी रक्तदान करावे, असे आवाहन रक्तदान चळवळीत सक्रिय असलेल्या दीपरक्तसेवा ग्रुप, विवेकानंद प्रतिष्ठान रक्तसेवा ग्रुप यांच्या वतीने करण्यात येत आहे.

जिल्ह्यात १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे. रक्तदात्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाचे संकट आणि त्याच बरोबरच कडक उन्हाळ्यामुळे रक्तदानाची चळवळ मंदावली आहे. काही सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या पुढाकारानंतर रक्तदानाचा ओघ वाढला होता. परंतु अठरा वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरु झाल्यानंतर रक्तदात्यांचा ओघ कमी होणार आहे. लस घेतल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. यामुळे नागरिकांनी लस घेण्याआधी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आताच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा आहे. त्यातच लसीकरणाचा ओघ वाढल्यानंतर ज्या पध्दतीने रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला, त्याच पध्दतीने १५ मेनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर उपलब्ध होणे शक्य आहे. मात्र, रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदान हेच एकमेव साधन आहे. यामुळे नागरिकांनी लसीकरणाला जाण्याआधी रक्तदान करावे, असे आवाहन रक्तदान चळवळीत सक्रिय असलेल्या संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. भविष्यातील रक्ताचे संकट विचारात घेऊन विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनीदेखील व्यापक प्रमाणात रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

धुळे जिल्ह्यात दीपरक्तसेवा ग्रुप आणि विवेकानंद प्रतिष्ठान या दोन प्रमुख संघटनांच्या माध्यमातून रक्तदान चळवळ सक्रिय आहे. या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून के. डी. शर्मा, अमोल शिंदे, महेश निकम यांनी रक्तदानासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृतीदेखील करण्यात येत आहे.

Web Title: Blood shortage, donate blood before vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.