पुलाच्या दुरूस्तीसाठी भाजपचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:24+5:302021-09-10T04:43:24+5:30
दोंडाईचा : दोंडाईचा शहराबाहेरील म्हणजे डायव्हर्शन रस्त्यावर अमरावती नदीवर असलेल्या पुलाची अत्यंत दुर्दशा झाली असून या पुलावर भले मोठे ...

पुलाच्या दुरूस्तीसाठी भाजपचा रास्तारोको
दोंडाईचा : दोंडाईचा शहराबाहेरील म्हणजे डायव्हर्शन रस्त्यावर अमरावती नदीवर असलेल्या पुलाची अत्यंत दुर्दशा झाली असून या पुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. एकेरी वाहतूक करण्यात आली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, या प्रमुख मागणीसाठी आज दोडाईचा भाजपमार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, महामार्ग उपअभियंत्यांनी आंदोलनकर्त्यांना पूल दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
दोंडाईचा शहराचा बाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्यावर अमरावती नदीवर पूल उभारला असून या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. पुलावरील रस्ता व पुलाचे संरक्षण कठडे याची दुर्दशा झाली आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यांतून आरपार दिसते. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे वर्ग केला आहे. रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती २०२२ पावेतो असली तरी सार्वजनिक विभागा रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे दोंडाईचा भाजपतर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत रस्ता व पूल दुरुस्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
रास्ता रोको आंदोलनात भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, युवा मोर्चा शहराध्यक्ष भाजप राजू धनगर, उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, सरचिटणीस कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, बांधकाम सभापती निखिल जाधव, माजी नगरसेवक जितेंद्र गिरासे, विजय मराठे , नरेंद्र गिरासे, ईश्वर धनगर, नितीन सदाराव, मनोहर कापुरे, विजय नाईक, जयदीप आघाव, रोहित ठाकूर, अजय निकवाडे,
चेतन मराठे, संजय चंदने, रवी अहिरे आदी उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूला वाहनांची भली मोठी रांग लागली होती.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गचे अभियंता अरुण तेजी यांनी आंदोलनकर्त्यांना पूल व रास्ता दुरूस्तीचे आश्वासन भ्रमणध्वनीवर दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन माघारी घेतले .पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
फोटो--पूल दुरुस्ती साठी रास्ता रोको आंदोलनात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते.