भाजपत जल्लोष,अजित पवार समर्थक द्विधा मनस्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:07 IST2019-11-24T22:03:51+5:302019-11-24T22:07:13+5:30
विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया । शिवसेनेकडून आमचाचं मुख्यमंत्री होईल असा दावा

Dhule
धुळे : राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्याने जिल्ह्यात शहरासह विविध ठिकाणी जल्लोष करून नव्या सरकारचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तर जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस मधील प्रमुख पदाधिकारी यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. अजित पवार समर्थक राष्टÑवादीतील पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले. ते द्विधा मनस्थितीत दिसून आले. मात्र राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसेसह अन्य पदाधिकाºयांनी मात्र आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.
शहरात आतषबाजी, नृत्य
राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात येताच महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक प्रदीप कर्पे, नगरसेवक हिरामण गवळी, यशवंत येवलेकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी वि.का. राजवाडे चौकात जल्लोष केला. यावेळी परस्परांना पेढे भरवून तसेच उत्स्फूर्त नृत्य करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
तालुका भाजपतर्फेही जल्लोष
सरकार स्थापनेचे तालुका भाजपतर्फेही जल्लोष करून स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षनेते सुभाष देवरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा.अरविंद जाधव, तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परस्परांच अभिनंदन करून पेढे भरविले.
शिरपुरात ठिकठिकाणी जल्लोष
शहरात या निमित्त मिरवणूक काढून जल्लोष झाला. पक्ष कार्यालयापासून बाजारपेठेपर्यंत तसेच तेथून आमदार अमरिशभाई पटेल यांच्या निवासस्थानापर्यंत येऊन मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी पेढे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार काशीराम पावरा, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे उपस्थित होते. यानंतर येथे विजयस्तंभापासून जल्लोष करत आमदार कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते व माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांची भेट घेतली.
मालपूर येथेही स्वागत
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथेही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास येथील बसस्थानकावरील पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाक्यांंची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा करत जल्लोष केला. यावेळी श्रावण अहिरे, सचिव बारकू मोरे भाऊसाहेब मराठे, तुकाराम माळी, विरेंद्र गोसावी, भटू रावल, रवींद्र पाटील लक्ष्मण पानपाटील, श्रीराम अहिरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.