खडीमुळे दुचाकी घसरली, महिला जीवानिशी गेली!
By देवेंद्र पाठक | Updated: December 26, 2023 17:58 IST2023-12-26T17:58:08+5:302023-12-26T17:58:21+5:30
मंदाणेकडून दोंडाईचाकडे येताना घडली दुर्घटना

खडीमुळे दुचाकी घसरली, महिला जीवानिशी गेली!
धुळे : भरधाव दुचाकीवरून खाली पडल्याने महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचार घेताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. सोमवारी रात्री दोंडाईचा पोलिस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मंगलाबाई रजेसिंग गिरासे (वय ४२, रा. मंदाणे) असे मयत महिलेचे नाव आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ गावाच्या शिवारात मंदाणे दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या एका आश्रमजवळ गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजुला खडीचे ढिगारे पडून आहेत. काम सुरू असल्याबाबत कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. वाहने त्या खडीवरून जाऊन घसरत असल्याने अपघात होत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ ते साडेअकरा वाजेच्या सुमारास एमएच १८ सीबी ८११२ क्रमांकाच्या दुचाकीने मंगलाबाई रजेसिंग गिरासे आणि संदिप विजयसिंग गिरासे हे दोघे मंदाणेकडून दोंडाईचाकडे येत होते.
दगडामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले. दुचाकीचे नुकसान झाले. मंगलाबाई गिरासे यांच्या डोक्याला दुखापत झाली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी संदीप विजयसिंग गिरासे यांनी सोमवारी रात्री पावणेदहा वाजता दिलेल्या फिर्यादीवरून रस्ता कामाच्या ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक श्रीराम पवार करीत आहेत.