मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन झालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 13:38 IST2019-04-07T13:37:13+5:302019-04-07T13:38:26+5:30
अनिल गोटे यांची माहिती : उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन झालेच नाही
लोकमत आॅनलाईन
धुळे : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन झालेले नाही. १६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांनी या मार्गाचे भूमिपूजन केल्याचे सांगितले जाते. मात्र या रेल्वेमार्गाला अद्याप तांत्रिक मंजुरीच मिळालेली नाही, हे वास्तव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वत: आपण या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन केले, असे म्हटलेले नाही, असे आमदार अनिल गोटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या मार्गाच्या जमीन अधिग्रहणाची नोटीस अद्याप दिली गेलेली नाही. तशी ती द्यावी लागते. त्यानंतर हरकती, सूचना महत्त्वाच्या आहेत. मला संधी मिळाल्यास दोन वर्षात या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरूवात होईल. तसेच धुळे शहराजवळ रेल्वेला कारखान्यासाठी मोफत जागा मिळवून देईल. मी जाती-धर्माच्या नव्हे तर विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहे. संपूर्ण मतदारसंघात फिरून मी सर्वसामान्य, शेतक-यांशी चर्चा केली. गेल्या ६० वर्षात नाव घेता येईल असा एकही प्रकल्प मतदारसंघात आलेला नाही. कॉँग्रेसचे विजय नवल पाटील यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले. त्या नंतर गेल्यावेळी डॉ.सुभाष भामरे यांना मंत्रीपद मिळाले. परंतु मतदारसंघातील लोकांना काही मिळालेले नाही. मनमाड-इंदूर हा ३६६ कि.मी. रेल्वेमार्गाच्या निर्मितीशिवाय या मतदारसंघातील दलित, मुस्मिल व आदिवासी समाजबांधवांचे नशीब बदलू शकत नाही. ते सर्व या रेल्वेमार्गाच्या बाजूने आहेत.
मंगळवारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करू, असेही ते म्हणाले. यावेळी तेजस गोटे, दिलीप साळुंखे, हिंमत पवार, प्रशांत भदाणे आदी उपस्थित होते.