शिरपूर तालुक्यात ‘भोंगऱ्या’ बाजाराला उत्साहात सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:13 IST2020-03-04T12:13:09+5:302020-03-04T12:13:25+5:30
मोठ्या ढोलच्या तालावर आदिवासी बांधवांनी मनसोक्त केले नृत्य, बाजारात झाली लाखोंची उलाढाल

शिरपूर तालुक्यात ‘भोंगऱ्या’ बाजाराला उत्साहात सुरूवात
आॅनलाइन लोकमत
शिरपूर (जि.धुळे) : आदिवासी बांधवासाठी पर्वणी असलेल्या भोंगºया बाजाराला तालुक्यातील सुळे येथुन मंगळवारी जल्लोषात सुरूवात झाली़ लोकगीत गायन, बासरी व ढोलच्या आवाजात नृत्य करीत जल्लोषात हा उत्सव साजरा झाला. मोठ्या ढोलच्या तालावर ठेका धरत आदिवासी स्त्री-पुरूष नाचण्यात मग्न होती़ दरम्यान या बाजारात १२-१५ लाखाहून अधिक उलाढाल झाली.
३ मार्च रोजी सुळे व आंबा गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता. याशिवाय मध्यप्रदेशातील रोसर, पलसुद, नागलवाडी, मंडवाडा, चाचरीया व बाबदड येथेही भोंगºया उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला़ बाजाराच्या दिवशीच हा भोंगºया बाजार भरतो. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंद द्विगुणित करून व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे. तरूणांमधील सळसळता उत्साह आणि आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन या भोंगºया बाजारातून घडले.
सकाळपासून दाखल
सकाळपासूनच परिसरातील गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून आले होते. आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून तर काही मिळेल त्या वाहनातून बाजाराला आले होते. दुपारनंतर बाजारात गर्दी उसळली होती.
पोशाखाने लक्ष वेधले
तरुण-तरुणींनी खास आदिवासी पोशाख, काहींनी कमरेभोवती आकर्षक शाली गुंडाळल्या होत्या. पारंपरिक आदिवासी गितांसह काही हिंदी चित्रपटांच्या गीतांची धुनही आपल्या बासरीतून वाजवित होते.
नृत्य करून आनंद लुटला
आदिवासी बांधवांनी गटा-गटाने नृत्य करून आनंद लुटला. भोंगºया बाजार पाहाण्यासाठी खास बाहेरगावाहून आदिवासी मंडळींनी हजेरी लावली होती. आदिवासी महिला व तरुणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली़
गर्दीने फुलले रस्ते
आदिवासी महिला व तरुणींनी वस्त्रालंकार तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी येथील विक्रेत्यांकडे गर्दी केली होती. त्यामुळे नेहमीच्या आठवडे बाजारापेक्षा आज मात्र इतर दिवसांपेक्षा बाजार अधिक फुलला होता. सर्वच रस्ते गर्दीने फुललेले दिसत होते. होळी सणांसाठी लागणारा सामान व साहित्यांची खरेदी आदिवासी बांधव करत होते. होळीच्या दिवशी प्रसाद म्हणून लागणारे दाळ्या, फुटाणे, साखरेचे कंगणहार विक्रेत्यांकडून घेत होते. दरम्यान तालुक्यात आता आठवडाभर भोंगºया बाजाराचा उत्साह बघावयास मिळणार आहे.