कापडणे परिसरात भालदेवाची उत्साहात स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:17+5:302021-09-08T04:43:17+5:30
भारतीय संस्कृतीत दगडाला नव्हे तर शेणालाही पूजले जाते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खान्देशातील पारंपरिक भालदेव सण होय. ही परंपरा ...

कापडणे परिसरात भालदेवाची उत्साहात स्थापना
भारतीय संस्कृतीत दगडाला नव्हे तर शेणालाही पूजले जाते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खान्देशातील पारंपरिक भालदेव सण होय. ही परंपरा ग्रामीण भागात आजही कायम सुरू आहे. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस व पोळा सणाच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेवाचे आगमन होते. अष्टमीला भालदेवाचे विसर्जन केले जाते. काही सणांची कुठल्याच दिनदर्शिकेत नोंद नसते; परंतु हे सण रुढी-परंपरांची जोपासना करण्यासाठी साजरे केले जातात. त्यामुळे परस्परात स्नेहसंबंधही निर्माण होतात.
भालदेव उत्सवाची परंपरा आजही खान्देशात टिकून आहे. भारत कृषिप्रधान देश असल्याने दुभत्या पशूंना देव मानण्याची परंपरा आहे. त्या दैवतांची पूजा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. घरातील ठराविक जागा गायीच्या शेणाने सारवून गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध करून भालदेवाची विधीवत स्थापना केली जाते. भालदेवाचे घरात आगमन झाल्यानंतर विसर्जन होईल तोपर्यंत घरातील कोणतीही वस्तू विकली जात नाही. दुभत्या जनावरांपासून मिळणारे दूध व दुधापासून बनवलेले पदार्थ घरी खाण्यासाठी ठेवले जातात. दुग्धजन्य पदार्थ दुसऱ्याला दिले जात नाही. ज्यांच्या घरी दुभती जनावरे आहेत त्यांच्या घरी ओला भालदेव व ज्यांच्याकडे जनावरे नसतील त्यांच्याकडे कोरडा सुका भालदेव बसविला जातो. हा उत्सव पाच, सात व नऊ दिवसांचा साजरा केला जातो. शेणाच्या भालदेवावर घरातील केरकचरा, चुलीतली राख टाकली जाते. विसर्जनाच्या दिवशी रूचकिनीच्या (रुई) सात पानावर गायीच्या शेणाचे गोळे करून ठेवले जातात. त्यावर नदीतून आणलेले पांढऱ्या रंगाचे खडे ठेवले जातात. यासोबतच पूजेसाठी लव्हाळे, दवंडी गवत व भालदेवावर दूध, दही, भात शिंपडला जातो व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अष्टमीला भालदेवाचे विधीवत विसर्जन केले जाते.