पर्यटकांनो काळजी घ्या; धबधब्यासोबत सेल्फीचा मोह बेतू शकतो जिवावर !लळिंग धबधब्यावर अनेकांनी गमावला जीव; इतरही धबधब्यांवर सुरक्षांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST2021-09-12T04:41:30+5:302021-09-12T04:41:30+5:30
जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची ...

पर्यटकांनो काळजी घ्या; धबधब्यासोबत सेल्फीचा मोह बेतू शकतो जिवावर !लळिंग धबधब्यावर अनेकांनी गमावला जीव; इतरही धबधब्यांवर सुरक्षांची गरज
जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. साक्री तालुक्यात अलालदरी आणि काकाकाकी धबधब्यावर मात्र फारसी गर्दी होत नाही.
लळिंग धबधब्यावर गेल्या काही वर्षांत ५०पेक्षा अधिक तरुणांचा बळी गेला आहे. त्यामुळे याठिकाणी तार कम्पाउंड करून धबधब्याकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे. शिवाय याठिकाणी सेल्फी काढण्यास आणि पोहोण्यास बंदी आहे. वन कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त असतो. इतर धबधब्यांवर मात्र सुरक्षा नाही.
लळिंग किल्ल्यावरदेखील सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या वर्षी सेल्फी काढण्याच्या नादात एका विवाहितेचा जीव गेला होता. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी.
अलालदरी धबधबा
साक्री तालुक्यात वनविभागाने अलालदरी धबधबा क्षेत्रात पर्यटनस्थळ विकसित केले आहे. याठिकाणी संरक्षक कम्पाउंड आणि शेड उभारले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत उंच धबधबा असल्याने सेल्फीसाठी धोकेदायक आहे. धबधब्याच्या उमापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. परंतु पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्ता आहे. तेथून धबधब्याचे निसर्गसाैंदर्य पाहता येते. काळजी घेणे आवश्यक आहे.
नवादेवी धबधबा
शिरपूर तालुक्यात नवादेवी आणि धाबादेवी हे दोन धबधबेदेखील आता सर्वदूर प्रसिद्ध झाले असून, दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ विकसित केले नसल्याने सुरक्षेच्या कोणत्याही उपायोजना नाहीत. पर्यटकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने पोहोणाऱ्यांचे आणि सेल्फी काढणाऱ्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते. पर्यटकांनी काळजी घ्यावी.
धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही
लळिंग धबधब्याचा अपवाद वगळता लळिंग किल्ला आणि जिल्ह्यातील इतर धबधब्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत किंवा सूचना देणारेदेखील कोणी नाही. त्यामुळे पर्यटकांनी स्वत:च काळजी घेणे आवश्यक आहे.
जबाबदार कोण?
लळिंग धबधब्यावर आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. त्यात कुणालाही जबाबदार धरले नाही. पर्यटक स्वत:च जबादार आहेत. किल्ल्यावरील दुर्दैवी घटनेलाही पर्यटकच जबाबदार होते. परंतु इतर धबधब्यांवर सुरक्षा उपाययोजना नसल्याने जबाबदार कोणाला धरणार? असा प्रश्न आहे.