केवळ ५० रुपयांवरुन लोखंडी पावडीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:34 IST2021-03-24T18:34:45+5:302021-03-24T18:34:58+5:30
आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

केवळ ५० रुपयांवरुन लोखंडी पावडीने मारहाण
धुळे : उसनवारीने ५० रुपये देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला लोखंडी पावडीने मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
शहरातील अभय कॉलेजजवळ रामनगरमध्ये राहणारा योगेश रामेश्वर मराठे (२२) या तरुणाने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ अजय उर्फ भुरा पाटील (रा. बाजार समितीच्या मागे, नाला किनारी, धुळे) याने योगेश मराठे याच्याकडे ५० रुपये उसनवारीने मागितले. ते देण्यास योगेश याने नकार दिला. यावरुन दोघांमध्ये वाद होऊन तो वाद क्षणात विकोपाला गेला. शिवीगाळ करीत वेळ हाणामारीपर्यंत येवून पोहचली. त्याचवेळेस अजय पाटील याने योगेश मराठे याला लोखंडी पावडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळेस योगेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही काळ वातावरण तणावाचे झाले होते. या घटनेनंतर तातडीने योगेश याला रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी योगेश मराठे याने आझादनगर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरा फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित अजय उर्फ भुरा पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.