वीजबिल चेकने देत असाल तर सावधान; होऊ शकतो दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST2021-08-12T04:40:52+5:302021-08-12T04:40:52+5:30
सुनील बैसाणे धुळे : धनादेशाद्वारे वीजबिल अदा करीत असाल तर कोणत्याही कारणास्तव धनादेश बँकेतून परत आला तर चेक बाऊन्सचा ...

वीजबिल चेकने देत असाल तर सावधान; होऊ शकतो दंड
सुनील बैसाणे
धुळे : धनादेशाद्वारे वीजबिल अदा करीत असाल तर कोणत्याही कारणास्तव धनादेश बँकेतून परत आला तर चेक बाऊन्सचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे धनादेशाद्वारे वीजबिल अदा करणाऱ्या ग्राहकांनी आपल्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक आहे किंवा नाही याची खातरजमा करून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
परंतु धनादेशाद्वारे वीजबिलाचा भरणा करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. विशेष करून सरकारी कार्यालये तसेच उद्योजक धनादेशाचा वापर करतात. सर्वसामान्य ग्राहक मात्र प्रत्यक्ष काऊंटरवर जाऊनच वीजबिल भरतात. शहरी भागात मोबाइलद्वारे ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांचे प्रमाण कोरोनाच्या काळात वाढले आहे. ग्रामीणमध्ये मात्र तसे दिसत नाही.
चेक परत जाण्याचे प्रमाण कमी
धुळे जिल्ह्यात महावितरणकडे किती वीज ग्राहक धनादेशाद्वारे वीजबिल अदा करतात आणि त्यापैकी दर महिन्याला किती धनादेश परत जातात याची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही. परंतु सहसा औद्योगिक ग्राहक चेकने भरणा करीत असल्याने चेक परत जाण्याचे प्रमाण कमी आहे. सर्वसामान्य ग्राहक अजूनही प्रत्यक्ष काऊंटरवर जाऊनच वीजबिल भरण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून अनेक ग्राहकांनी घरबसल्या मोबाइलद्वारे ऑनलाइन पेमेंट करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे वेळेबरोबरच पैशांचीदेखील बचत होत आहे.
बिलापेक्षा जास्त होऊ शकतो दंड
सर्वसामान्य ग्राहकांना पाचशे ते सातशे रुपयांच्या आतच बिल येते. त्यांचा वीज वापर कमी असतो.
अशा ग्राहकांनी चेक दिला असेल आणि तो बाऊन्स झाला तर बिलापेक्षा जास्त दंड होऊ शकतो.