लसीकरणाच्या नोंदणीसाठी घ्यावा लागतो टाकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:51+5:302021-08-13T04:40:51+5:30

रोहिणी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र खामखेडामधील हिवरखेडा हे गाव महाराष्ट्र सीमेवरील शेवटचे गाव आहे. येथून मध्यप्रदेश राज्याची सीमा ...

The base of the tank has to be taken for registration of vaccination | लसीकरणाच्या नोंदणीसाठी घ्यावा लागतो टाकीचा आधार

लसीकरणाच्या नोंदणीसाठी घ्यावा लागतो टाकीचा आधार

रोहिणी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र खामखेडामधील हिवरखेडा हे गाव महाराष्ट्र सीमेवरील शेवटचे गाव आहे. येथून मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. अशा आदिवासीबहुल दुर्गम भागातील हिवरखेडा गावात कोविड प्रतिबंधक लसीकरण आयोजित केले होते. या गावात समतल भागात दोन्ही राज्यांचे पुरेसे नेटवर्क मोबाईल रेंज उपलब्ध होत नाही.

शासनाच्या नियमानुसार कोविड लसीकरणासाठी अगोदर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी झाल्याशिवाय लसीकरण करता येत नाही. त्यामुळेच हिवरखेडा येथे पुरेसे नेटवर्क राहील अशा जागेचा शोध घेऊन आरोग्य कर्मचारी लसीकरण पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राष्ट्रपाल अहिरे, आरोग्यसेवक अनिल मराठे, किरण सपकाळे, प्रमिला सस्ते तसेच आशा स्वयंसेवक व ग्रामस्थ यांचे नोंदणीसाठी सहकार्य घेऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे.

१० रोजी डॉ. राष्ट्रपाल अहिरे, जि.प. सदस्य कैलास पावरा मार्गदर्शनाखाली हिवरखेडा येथे रामेश्वर पावरा यांनी आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांची प्रतिमेची पूजन करून कोरोना लसीकरण करण्यात आले़ अंगणवाडीसेविका प्रमिला सस्ते, गटप्रवर्तक आशा वळवी, आशाकर्ता संगीता पावरा, अंगणवाडी सेविका लीलाबाई पावरा, लताबाई पावरा आरोग्यसेवक किरण सपकाळे व अनिल मराठे यांचे सहकार्य लाभले.

छोटीपाणीनंतर हिवरखेडालाही मोबाइल नेटवर्कची समस्या असल्यामुळे पाण्याच्या टाकीवर बसून ॲानलाइन नोंदणी करण्यात आली. विश्व मंडळ सेवाश्रम शिरपूर यांच्यामार्फत आदिवासी भागात कोरोना लसीकरण संदर्भात जनजागृती केली जात असल्यामुळे आता लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

फोटो- मेलवर पाहावा.

Web Title: The base of the tank has to be taken for registration of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.