साक्री तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील आदर्श गाव बारीपाडा येथे गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. गावातील पर्यावरण अभ्यास केंद्र येथे बारीपाडा ग्रामविकास समिती आणि देवगिरी कल्याण आश्रमतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर बारीपाडा सरपंच सुनीता मधू बागूल, ग्रामविकास समितीचे अध्यक्ष चैत्राम पवार, देवगिरी कल्याण आश्रमचे विजय पवार, उपाध्यक्ष मोतीराम पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वाटप - कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आठ ग्रामपंचायतीच्या लोकांना सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना चैत्राम पवार यांनी बारीपाडा गावात ग्रामस्थांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जंगल, जल, जमीन यात विविध प्रकारचे प्रयोग करून गावाचा विकास कसा घडवून आणला याची माहिती दिली.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले की, मी जीवनात खूप फिरलो आहे. पण बारीपाडा गावात आल्यानंतर नवीन अनुभव आला. या गावाने सामूहिक प्रयत्न केले तर जंगल, जल आणि माणसाचे जीवन कशापद्धतीने फुलते आणि गावातील प्रत्येक नागरिक कसा आत्मनिर्भर बनतो याचे एक सुंदर उदाहरण सर्वांसमोर उभे केले आहे.
विरोध हा मानवी स्वभावच - चैत्राम पवार यांनी सांगितले की, संपूर्ण गाव एकीकडे आणि १० ते १२ कुटुंबे विरोधात आतहे. त्याला घाबरू नये कारण विरोध हा मानवी स्वभाव आहे. संसदेमध्येही विरोधक असतात. पण त्याला न घाबरता काम केले पाहीजे. तसे केले तर बारीपाडासारख्या आदर्श गावाची निर्मिती होते. बारीपाडा येथे आदिवासी विकास, कृषी, महसूल आणि वनविभागाच्या सहकार्याने ग्रामस्थांनी घडविलेला बदल अनुकरणीय आहे. गावाच्या विकासाचा हा रथ पुढे नऊन अन्य गावांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. तसेच या गावात केलेल्या कामाचा प्रचार व प्रसार राज्य आणि केंद्रस्तरावर केला पाहिजे, यासाठी आपण राज्य शासन आणि केंद्र शासनाला सांगणार. असे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात त्याप्रमाणे बारीपाडासारखी अनेक गावे देशात निर्माण होतील आणि त्यातूनच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल.
महात्मा गांधी एक आदर्श- जीवनात एका सर्वसामान्य व्यक्तीने निश्चय केला तर काय होऊ शकते, याच्यासाठी महात्मा गांधी एक उत्तम उदाहरण आहेत.
कार्यक्रमास आमदार मंजुळा गावीत, जिल्हा परिषद अध्यक्ष डाॅ. तुषार रंधे, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
बारीपाडा संवर्धित वनास भेट - राज्यपाल कोश्यारी यांनी बारीपाडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीने संवर्धित केलेल्या वनाची पाहणी केली.