वकृत्व स्पर्धेत बादेशा जिलानी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST2021-05-03T04:30:54+5:302021-05-03T04:30:54+5:30
स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शारदा शितोळे यांचे अध्यक्षतेखाली व इंग्रजी विषयक प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, ...

वकृत्व स्पर्धेत बादेशा जिलानी प्रथम
स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शारदा शितोळे यांचे अध्यक्षतेखाली व इंग्रजी विषयक प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, डॉ. विजय बच्छाव यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक संघटनेकडून दरवर्षी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील वक्तृत्व कला तसेच त्यांच्या इतर भाषिक कौशल्य विकासासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धा विद्यापीठस्तरावर आयोजित केली जात असून, त्यासाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. ही स्पर्धा महाविद्यालय, जिल्हा आणि शेवटी विद्यापीठस्तरावर आयोजित केली जाते.
यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी संघटनेने आणि महाविद्यालयाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे विषय म्हणून कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण पद्धती, कोरोना प्रादुर्भाव काळात माझी भूमिका व जबाबदारी, माझे ऑनलाइन शिक्षणासंबंधी अनुभव, ऑनलाइन शिक्षण : फायदे आणि नुकसान हे देण्यात आले होते.
स्पर्धेत धुळे शहर, साक्री, निजामपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर आदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत बादेशा जिलानी (एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालय, धुळे), उर्मिला जयसिंघानी (दादासाहेब महाविद्यालय, दोंडाईचा), गीतांजली गुरव (एच. आर. पटेल कला महिला महाविद्यालय, शिरपूर) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. शिवाजी महाजन (चाळीसगाव) व डॉ. योगेश पाटील (बामखेडा) यांनी केले. स्पर्धा आयोजनासाठी विद्यापीठ इंग्रजी विषय प्राध्यापक संघटनेचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. गजानन पाटील, शिंदखेडाचे डॉ. सिद्धार्थ सावंत, धुळे येथील डॉ. दीपक चौधरी, प्रा. भरत सोनार, प्रा. विद्या पाटील यांनी परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. वर्षा पाटील (धुळे), डॉ.नरेंद्र पाठक (दोंडाईचा), डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. धनंजय पाटील (साक्री), डॉ. अजबराव इंगळे (निजामपूर) आदींनी सहकार्य केले.