बाबासाहेबांच्या आठवणी आजही देतात प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:46+5:302021-04-14T04:32:46+5:30

धुळे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे शहरातील आठवणी आजही ताज्या वाटतात. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शहरात विविध ...

Babasaheb's memories still inspire us today | बाबासाहेबांच्या आठवणी आजही देतात प्रेरणा

बाबासाहेबांच्या आठवणी आजही देतात प्रेरणा

Next

धुळे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे शहरातील आठवणी आजही ताज्या वाटतात. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शहरात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होते. ३१ जुलै रोजी लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रा भरते. राज्यासह इतरही राज्यांतून अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. वैचारिक आणि प्रबोधनपर कार्यक्रम, भीमगीत गायनाच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. धुळे जिल्ह्यातील सर्व पक्ष, संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी करतात. पुस्तकांचे स्टाॅल लागतात. या कार्यक्रमांना राष्ट्रीय नेते रामदास आठवले अनेकदा येऊन गेले आहेत. ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, वाल्मीक दामोदर, शशिकांत वाघ, मीनाताई बैसाणे यांचे मार्गदर्शन असते. तरुण पिढीकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.

संदेश भूमी स्मारकाची मागणी

धुळे शहरात बसस्थानकाच्या शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाला ब्रिटिशांच्या काळात ट्रॅव्हलर्स बंगला असे नाव होते. कोर्टाच्या कामानिमित्त आलेल्या बाबासाहेबांनी या बंगल्यात मुक्काम केला होता. याबाबतचे पुरावे आनंद सैंदाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधून काढले आणि सन २०१७ साली या विश्रामगृहात ज्या खोलीत बाबासाहेब थांबले होते त्या खोलीत पुतळा ठेवून स्मारक उभारले. विश्रामगृहाला स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी शासन प्रशासनाकडे लावून धरली आहे. दरवर्षी ३१ जुलै, जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाला विविध कार्यक्रम होतात. आतापर्यंत रांगोळी स्पर्धा, भीमगीत गायन, रक्तदान शिबिर झाले आहेत. विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अभिनव उपक्रमही राबविला आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाइन निबंध स्पर्धा झाली. याठिकाणी अभ्यासिक चालविली जाते. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम होतात. दर रविवारी सकाळी बुद्धवंदना होते. या स्मारकाला संदेशभूमी असे नाव दिले आहे, तसेच संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीची स्थापना केली आहे. आनंद सैंदाणे, रवी शिंदे, सुनील थाेरात, विजय मोरे, देवीदास शिरसाठ, अमित सोनवणे, रवींद्र इंदवे, विशाल सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते काम पाहतात. कोरोनामुळे यंदा सकाळी बुद्धवंदना होईल आणि त्यानंतर आमदारांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम होईल.

Web Title: Babasaheb's memories still inspire us today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.