पथनाट्यातून कोरोनाबाबत प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 22:24 IST2020-07-22T22:24:24+5:302020-07-22T22:24:32+5:30
नेर : जनजागृतीसाठी तरुणांनी केला अहिराणी मातृभाषेचा वापर

पथनाट्यातून कोरोनाबाबत प्रबोधन
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : गावातील तरुणांनी कोरोना महामारीबाबत अहिराणी भाषेतून पथनाट्य सादर करुन ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
देशात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने दुकाने, सर्व व्यवसाय, वाहतूक सेवा सुरू झाले आहेत. यामुळे बाजारपेठा व अन्य वर्दळीच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शासनाने कोरोना होऊ नये, त्यापासून स्वत:चा व इतरांचा बचाव कसा करावा, याबाबत सातत्याने जनजागृती चालवलेली आहे. परंतू तरीही काहीजण नियमांचे पालन न करता बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोनाचा शहरासह खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक होत आहे.
नेर ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी धुळे तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाने नेर येथील रहिवाशी व जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले चेतन माळी, सामाजिक कार्यकर्ते भूषण भदाणे, दिलीप साळुंखे, भगवान कोळी, भावेश अहिरे, प्रमोद मगरे, योगेश सोनवणे, दिपक जाधव यांनी पथनाट्यातून कोरोनाबाबत प्रबोधनाचे कार्य हाती घेतले.
गावातील गांधी चौकात पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे, नेर औटपोस्टचे प्रभारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, पोलीस नाईक प्रमोद ईशी, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, पोलीस पाटील रतिलाल वाघ, राजेंद्र मगरे, गोरख पगारे यांच्या उपस्थितीत पथनाट्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले चौक, सावता मंदिर परिसर, क्रांती चौक येथेही पथनाट्य सादरीकरण करुन जनजागृती करण्यात आली.