महासभेत कचरा टाकल्याने सत्ताधारी, विरोधक भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST2021-08-13T04:41:00+5:302021-08-13T04:41:00+5:30
महापालिकेच्या सभागृहात महासभा सकाळी ११ वाजता सुरु झाली़ यावेळी आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका, ...

महासभेत कचरा टाकल्याने सत्ताधारी, विरोधक भिडले
महापालिकेच्या सभागृहात महासभा सकाळी ११ वाजता सुरु झाली़ यावेळी आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका, अधिकारी वर्ग उपस्थित होते़
महापौरांसमोर फेकला कचरा
महासभेच्या अजेंड्यावर नामांतरासह कचरा संकलन आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय होता़ सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्ष नेते कमलेश देवरे, नगरसेवक उमेर अन्सारी, काँग्रेसचे साबीर शेख, समाजवादीचे अमिन पटेल आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी आपल्या हातात शहर कचरामुक्त करा अशी मागणी असलेला फलक आणि सोबत एका खोक्यात आणलेला कचरा घेऊन सभागृहात प्रवेश केला़ थेट महापौरांच्या आसनासमोर मोकळ्या जागेत घोषणाबाजी करीत खोक्यातील कचरा ओतून निषेध नोंदविला़ अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहात खळबळ उडाली़ विरोधकांच्या या कृत्यावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी देखील आक्रमक होत प्रतिउत्तर दिले़ कमलेश देवरे, साबीर खान, शितल नवले, हिरामण गवळी, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक उडाली़
प्रशासनाचा नाकर्तेपणाच
यावेळी विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांनी शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे़ नवीन ठेकेदाराला कार्यादेश का दिला जात नाही़ यामुळे प्रशासनाचा धिक्कार असून प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरात कचरा, अस्वच्छता पसरली आहे़ लोकांना विविध साथीचे आजार होऊ लागले आहेत़ लोकांचे हाल होत असून नगरसेवकांची आपल्या प्रभागात मोठी बदनामी करण्याचे काम प्रशासन करीत आहेत़
आमदारांवर तोंडसूख
नगरसेवक हिरामण गवळी यांनी नवीन कचरा संकलनाचा ठेका देण्याची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आलेली आहे़ पण, शहराचे आमदार यात खोडा घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला़ नगरसेवकांनी आंदोलन न करता याबद्दल त्यांना जाब विचारावा अशी टीकाही केली़ शितल नवले यांनीही आमदारांवर टीका केली़ आमदारांच्या तक्रारीनंतर काही पत्र शासनाकडून आले असतील तर प्रशासनाने त्याची माहिती सभागृहात द्यावी़ उगाच वेळकाढूपणा करू नये़ लोकांची कामे होत नसताना बिले मात्र काढली जातात असा आरोप करीत नवले यांनी प्रशासनाला धारेवर धरले़
टीकेची झोड उठविली
नगरसेवक उमेर अन्सारी, संजय भिल यांनी देखील कचरा, पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालय आदी मुद्यांवर टीकेची झोड उठविली़ माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी आपल्या प्रभागात स्वच्छतेची कामे होत नसल्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला़ मनपाचे स्वच्छता निरीक्षक काम करण्यास येतात, मात्र त्यांना कर्मचारी मिळत नाही़ ठेकेदाराकडून कचरा उचलला जात नाही़ मनपाकडून यावर कारवाई होणार नसेल तर स्वत: कचरा उचलायचा का, असा सवालही त्यांनी केला़