धुळ्याच्या यात्रेत चित्तथरारक कसरतींनी वेधले भाविकांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:56 IST2018-04-03T15:56:15+5:302018-04-03T15:56:15+5:30
मौत का कुवा : मंगळवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

धुळ्याच्या यात्रेत चित्तथरारक कसरतींनी वेधले भाविकांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील एकवीरादेवी यात्रोत्सवात लाकडी फळ्यांनी तयार केलेले उंच गोलाकार वर्तुळात चाळीसगावचे दोन व्यावसायिक त्यांचा जीव धोक्यात घालून यात्रेत पैसे कमविण्यासाठी ‘मौत का कुवा’ या प्रकारात चित्तथरारक कसरती सादर करीत भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गोलाकार वर्तुळात ते दोन्ही सुसाट वेगाने चारचाकी व दुचाकी गाड्या चालवून भाविकांचे मनोरंजन करत आहे. त्यांच्या या कसरतींना भाविकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात राहणारे अमीर खान व सैझाद शेख हे गेल्या २० वर्षांपासून ‘मौत का कुवा’ हा प्रकार यात्रेत सादर करत आले आहे. त्यांनी सांगितले, की परिस्थिती हालाखिची होती. कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त असल्याने कुटुंबाचा गाडा पुढे रेटायचा कसा? असा प्रश्न आमच्या समोर होता. अशा परिस्थितीत आम्ही मौत का कुवा हा प्रकार एका यात्रेत पाहिला. त्यानंतर हाच व्यवसाय करण्याचे आम्ही ठरविले. पाहता पाहता २० वर्ष उलटली. हा व्यवसाय आम्ही करत आहोत.
चांगले उत्पन्न मिळते
‘मौत का कुवा’ हा प्रकार सादर करणे सोपे नाही. गोलाकार वर्तुळात थोडासाही तोल गेला; म्हणजे सर्व संपले. सुरुवातीला हा व्यवसाय करण्याचे आम्ही ठरविले. तेव्हा आम्ही दिवस-रात्र मेहनत घेतली. बºयाच अडचणी आल्या. परंतु, या अडचणींवर मात करून आम्ही पुढे गेलो. यात्रेत आम्हांला चांगले उत्पन्न मिळते. अनेक भाविक आम्ही केलेल्या कसरती पाहून गाडी चालवत असताना तिकीटाव्यतिरीक्त आमच्या हातात पैसे देत असतात. त्यातून कुटुंबाचा गाडा आम्हांला चांगल्या प्रकारे रेटता येतो.