पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 21:25 IST2020-07-16T21:25:24+5:302020-07-16T21:25:43+5:30
महापालिका : २५० पेक्षा अधिक पथविक्रेत्यांचे बँकांकडे आॅनलाईन अर्ज

dhule
धुळे : केंद्र शासन पुरस्कृत पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेतून खेळते भांडवल प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत धुळे शहरातील अडीचशेपेक्षा अधीक पथविक्रेत्यांनी विविध बँकांमध्ये आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले आहेत़
दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी धुळे महानगरपालिकेने समिती गठीत केली आहे़ या समितीची बैठक गेल्या सोमवारी अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ नागरी उपजीविका अभियानातर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ बैठकीला सहायक आयुक्त पल्लवी शिरसाठ, तुषार नेरकर, फेरीवाला समिती सदस्य नितीन बंग, जयश्री शहा, अग्रणी बँक व्यवस्थापक मनोजकुमार दास, ए़ यु़ फायनान्सचे व्यवस्थापक जाकी कटारिया, शहर वस्तीस्तर संघ अध्यक्षा प्रिया माळी, प्रतिनिधी जिजाबाई फुलपगारे, मनपा बाजार विभाग प्रमुख किशोर सुडके, दीपक खोंडे आदी उपस्थित होते़
भाजीपाला, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, पाव, अंडी, कापड, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी यासह इतर लहान व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना कोरोना आणि लॉकडाऊनची सर्वाधिक झळ बसली आहे़ त्यामुळे सध्या त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे़ त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे़
धुळे मनपाने अंमलबजावणीला सुरूवात केली असून बँकांकडे आॅनलाईन अर्ज सादर केले जात आहेत़ अडीचशेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत़ सामान्य पथविक्रेत्यांना बँका कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे़
काय आहे केंद्राची योजना
४कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी बसविण्यासाठी केंद्र शासनाने पथविक्रेते आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे़ या योजनेत पथविक्रेत्याला खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांमार्फत १० हजार रुपयांचा पतपुरवठा कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिला जाईल़ नियमीत परतफेड केल्यास व्याजात सात टक्के सूट मिळेल़ तसेच पत निर्माण झाल्यास भविष्यात मोठे कर्ज उपलब्ध होण्याची हमी मिळेल़ डिजिटल व्यवहार केल्यास १२०० रुपये कॅशबॅकचा लाभ मिळेल़
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे़ महानगरपालिकेतील प्रकल्प किंवा बाजार विभागामार्फत शिफारसपत्र दिले जाईल़ त्यानंतर लाभार्थ्याने स्वत: किंवा सेतू सुविधा केंद्रात जावून बँकेकडे आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे़