शिरपूरला महामार्गावर दहिवदजवळील पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न, दरोडेखोरांनी १५ ते २० मिनिटात पंपाबाहेर उभ्या असलेल्या ट्रकच्या काचा फोडल्या, चालकावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:44+5:302021-09-16T04:44:44+5:30
शिरपूर : मुंबई - आग्रा महामार्गावरील दहिवद फाट्यानजिक असलेल्या स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर भल्या पहाटे ८ ते १० दरोडेखोरांनी ...

शिरपूरला महामार्गावर दहिवदजवळील पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न, दरोडेखोरांनी १५ ते २० मिनिटात पंपाबाहेर उभ्या असलेल्या ट्रकच्या काचा फोडल्या, चालकावर चाकूहल्ला
शिरपूर : मुंबई - आग्रा महामार्गावरील दहिवद फाट्यानजिक असलेल्या स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर भल्या पहाटे ८ ते १० दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोल पंपाची केबीन आणि बाहेर उभ्या असलेल्या ट्रकच्या काचा फोडल्या तसेच चाकूहल्ला करुन ट्रकचालकाला जखमी केले. यावेळी ट्रकसह चालकाने दरोडेखोरांवर टाॅमी उगारली, त्यानंतर दरोडेखोर फरार झाले. पंपाच्या केबीनचे लोखंडी गेट उघडण्यात दरोडेखोर अयशस्वी झाल्याने त्यांना तेथून पळ काढावा लागला.
बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान दहिवद फाट्याजवळील मुंबई - आग्रा महामार्गालगत असलेल्या श्री स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर ८ ते १० दरोडेखोर चाल करून आले. त्यांनी दगडफेक करुन पंपाच्या केबीनच्या काचा फोडल्या. यावेळी केबीनमध्ये दोन कर्मचारी झाेपले होते. दरम्यान, काच फुटल्याचा आवाज ऐेकून दोघेही घाबरले व केबीनमध्ये लपून बसले. केबीनला लोखंडी जाळी आणि गेट होते, त्यामुळे दरोडेखोर आत येऊ शकत नव्हते. दरोडेखोरांनी केबीनचा लोखंडी दरवाजा तोडण्याचाही प्रयत्न केला. सुमारे १५ ते २० मिनिटे त्यांनी दगडफेक केली, मात्र त्यांना दरवाजा उघडता आला नाही. केबीनमधील दोन्ही कर्मचारी आत लपून राहिले.
त्याचवेळी पेट्रोल पंपासमोर (एमएच ०४ जेके ८३१२) क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकच्या केबीनमध्ये चालक राजेश चौहान व सहचालक प्रेमजीत चौहान हे दोघे झोपले होते. दगडफेक आणि तोडफोडीचा आवाज ऐकून चालक राजेश चौहान हे जागे झाले. त्यांनी गाडीच्या केबीनचा लाईट लावला. हे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी ट्रकवरदेखील दगडफेक करत दोन्ही बाजूच्या काचा फोडल्या. त्यानंतर दरोडेखोरांनी चालकावर चाकूने हल्ला केल्यामुळे त्याच्या डाव्या बाजूला कंबरेजवळ दुखापत झाली. त्याचवेळी सहचालक जागा झाला. त्याने हा प्रकार पाहताच गाडीतील लोखंडी टाॅमी काढत दरोडेखोरांवर चाल केली, ते पाहून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. काही दरोडेखोर पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शेतातून तर काही समोरील महामार्गावरुन पसार झाले. हे दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील असून, त्यांनी तोंडाला रूमाल व अंगात फक्त बनियन घातले होते.
त्यानंतर घटनेची माहिती थाळनेर पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, माहिती दिल्यानंतर तब्बल एका तासानंतर पोलीस घटनास्थळी आले, तोपर्यंत सर्व शांत झाले होते. दरोडेखोरांकडे चाकू व गावठी कट्टा असल्याचे सांगितले जात आहे. दरोडेखोर पंपावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यासंदर्भात थाळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी सुरु होते.