साक्री पंचायत समिती कार्यालायातील हेमंत सूर्यवंशी, संजय साळुंखे, उमाकांत पाटील व अन्य एकजण असे चौघे कर्मचारी चारचाकी वाहनाने (क्र.एचएच १५-जीए ६९५०) साक्रीहून धुळ्याकडे येण्यासाठी निघाले होते. महिर गावाजवळ असलेल्या वळण रस्त्यावर त्यांच्या कारला काहीतरी लागल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून खाली उतरून पाहणी केली. त्यानंतर पुन्हा चारचाकी वाहनात बसल्यानंतर अज्ञात दोन-तीन जणांनी वाहनाजवळ येऊन, लाठ्याकाठ्यांनी व दगडाने त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर मारा केला. त्यामुळे वाहनाच्या उजव्या बाजूच्या काचा फुटल्या. कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, अज्ञात व्यक्तींनी त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत संजय साळुंखे यांच्या डोक्याला व हाताला, पायाला दुखापत झाली. जखमीवर साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात डॅा. विवेक जाधव यांनी प्रथमोपचार केले. हल्ल्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक प्रल्हाद बनसोडे करीत आहे.
साक्री पंचायत समिती अधिकऱ्यांच्या वाहनावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST