आषाढी एकादशीचा यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 14:52 IST2020-06-24T14:52:27+5:302020-06-24T14:52:54+5:30
शिरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर बाळदे व निमझरी येथील सर्व कार्यक्रम रद्द

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : खान्देशातील प्रति पंढरपूर असलेल्या तालुक्यातील बाळदे व निमझरी येथील पांडूरंगाची यात्रा आषाढी एकादशीनिमित्त भरते़ मात्र, यंदा कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन्ही मंदिरातील यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे़ त्यादिवशी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाला यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने सुध्दा त्यादिवशी मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात येतील, असे सांगितले आहे.
शिरपूरपासून सुमारे १२ किमी अंतरावर तापी नदीच्या काठावर बाळदे गाव आहे. बाळदे येथील या ट्रस्टची स्थापना माजी आमदार संभाजीराव पाटील यांनी केली आहे. पंढरपूरच्या मंदिराप्रमाणेच येथील मंदिराची रचना असल्याने खान्देशातील हजारो भाविकांचे हे प्रति पंढरपूर श्रध्देचे दैवत बनले आहे.
विठ्ठल नामाच्या गजरात येतात दिंड्या
दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरप्रमाणे येथेही भजन-किर्तन व महापूजेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आषाढीला उत्तर महाराष्ट्रातून शेकडो वारकरी दिंंड्या घेवून विठ्ठल नामाचा गजर करीत येतात़ त्यामुळे विठ्ठल नामाच्या जयघोषाने बाळदे येथील प्रति पंढरी देखील विठ्ठल नामाने दुमदुमून जाते. सारा भक्तगण भक्ती सागरात डुबलेला असतो. मात्र, कोरोना संसर्गजन्य आजारामुळे भक्तांना या भक्ती सोहळ्याचा आनंद घेता येणार नाही.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निमझरी येथे गेल्या ८ वर्षापूर्वी श्री विठ्ठल रूखमाई मंदिर बांधण्यात आल्यामुळे याही मंदिरात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात़ आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते़ सध्या कोरोना संसर्गजन्य आजार सर्वत्र पसरला आहे़ आषाढी एकादशीनिमित्त या दोन्ही मंदिरात यात्रा भरते़
सदर यात्रा १ जुलै रोजी आहे़ मात्र कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी दोन्ही मंदिरातील नियोजित यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.
सदर यात्रेत येणारे भाविक, व्यावसायिक, दुकानदार, पुजापत्री विक्रेत्यांनी येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे़ यात्रोत्सव काळात होणारा किर्तन व भजनाचा सोहळा देखील रद्द करण्यात आला आहे़ यादिवशी फक्त मंदिराचे पुजारी, विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पांडूरंगाची नित्य नियमाने पुजा, काकडारती, अभिषेक केला जाईल़ त्यामुळे भाविकांनी पांडूरंगाचे नामस्मरण व पूजापाठ घरीच करावे. अशा आशयाचे निवेदन निमझरी येथील मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह़भ़प़ छगन गोरख गुजर व बाळदे मंदिराचे ट्रस्टी मनोहर पाटील यांनी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिले़ त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवून मंदिराकडे कुणाला जावू देणार नसल्याचे सांगण्यात आले़