आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना किमान वेतन कायदा लागू करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:49 IST2019-07-27T20:48:34+5:302019-07-27T20:49:44+5:30
धुळ्यात झाला मेळावा, हजारपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांची होती उपस्थिती

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना किमान वेतन कायदा लागू करावा
आॅनलाइन लोकमत
धुळे : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना किमान वेतन कायदा लागू करून, त्यांना दरमहा १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, नोकरीची शाश्वती मिळाली पाहिजे आदी मागण्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी आज केल्या.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा शनिवारी संत रविदास उद्यान हॉल, देवपूर रोड धुळे येथे पार पडला. त्यात वरील मागण्या करण्यात आल्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील होते. व्यासपीठावर संघटनेच्या कार्याध्यक्षा माया परमेश्वर, उपाध्यक्ष युवराज बैसाणे, सरचिटणीस गजानन थळे, प्रतिक्षा क्षीरसागर होते.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाच्या प्रलंबित मागण्या शासनाने मंजूर कराव्यात यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी आंदोलन करून मागण्या मांडीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून सरकारने आशा स्वयंसेविकांना दरमहा कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त ५०० रूपये मानधन अदा करण्याबाबत निर्णय घेतला. या मानधनाची रक्कम अतिशय अल्प असून, त्यातून गुजराण करणे कठीण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा झाला.
कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांसह प्रश्न मांडण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करत ते सोडविण्यासाठी संघटना तत्पर असल्याचे रामकृष्ण पाटील यांनी सांगितले. निवडणूकीपूर्व आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मागण्या शासनाने पूर्ण करव्यात. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्यात सुमारे एक हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अॅड. गजानन थळे यांनी केले.