सेंद्रीय शेतीची माहिती घेण्यासाठी युरोपातील पथकाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:57 IST2019-11-19T22:56:32+5:302019-11-19T22:57:17+5:30
शिरपूर तालुका : झेंडेअंजन येथील सेंद्रीय शेतीचे केले व्हिडीओ चित्रीकरण

सेंद्रीय शेतीची माहिती घेण्यासाठी युरोपातील पथकाचे आगमन
शिरपूर : तालुक्यातील झेंडेअंजन गाव पूर्णपणे सेंद्रीय शेती करीत असल्याची ख्याती असल्यामुळे ती शेती कशी करतात त्याचे चित्रण करण्यासाठी युरोपातील हेन्स फिटर यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली़ त्याचे चित्रण युरोपात दाखविले जाणार असल्याचे सांगण्यात आले़
१९ रोजी सकाळी युरोपीयन हेन्स फिटर यांनी तालुक्यातील झेंडेअंजन अंतर्गत असलेल्या रतनपाड्यावरील सतिलाल रतन पावरा यांच्या सेंद्रीय शेतीची माहिती जाणून घेतली़ पावरा यांनी सुमारे ३५-४० एकरावर सेंद्रीय कापसाची लागवड देशी वाणाची केली आहे़ सेंद्रीय कापसाची शेती कशी केली जाते, कापूस कसा वेचला जातो, तो टोपल्यात कसा नेला जातो, कुठे ठेवला जातो याची माहिती घेवून त्याचे चित्रण केले़
युरोपात सेंद्रीय शेती कशी करावी त्याचे हे चित्रण दाखविले जाणार असल्याचे हेन्स फिटर यांनी सांगितले़ त्यांच्या सोबत बायोरे इंडिया कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर सुकदेव गोस्वामी, फिल्ड मॅनेजर अशोक सिंग, धनसिंग चव्हाण, वासुदेव बाजाड आदी उपस्थित होते़ ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने देखील सेंद्रीय शेतीचे चित्रण करण्यात आले़
गेल्या १५ वर्षापासून सतिलाल पावरा हे पूर्णत: सेंद्रीय शेती करीत आहेत़ उशिरा झालेल्या पावसामुळे यंदा खरीपाचे उत्पन्न कमी येणार असले तरी रब्बी हंगाम चांगला येईल़ यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरी देखील तुडूंब भरल्या आहेत़ जून अखेर लागवड केलेल्या कापूस वेचणीला आता सुरूवात झाली आहे़