गणेश विसर्जनासाठी राहणार ३७ ठिकाणी व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:42+5:302021-09-17T04:42:42+5:30
जिल्ह्यात यंदा नियमांचे पालन करुन सुमारे ५०० मंडळांनी गणेशाची स्थापना केलेली आहे. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत ...

गणेश विसर्जनासाठी राहणार ३७ ठिकाणी व्यवस्था
जिल्ह्यात यंदा नियमांचे पालन करुन सुमारे ५०० मंडळांनी गणेशाची स्थापना केलेली आहे. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. परिणामी दरवर्षी गणेशोत्सवात रोषणाईने झळाळणारे चौक यंदाच्या वर्षी सुनेसुने दिसून येत आहे. शहरात पहिल्या टप्प्यात दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. त्यानंतर मंगळवारी पाचव्या दिवशी १० मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. त्यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील सात मंडळांचा समावेश होता. श्री गणरायाची स्थापना होऊन सात दिवस झाले असून आजही सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे.
आता शेवटच्या टप्प्यात अनंत चतुदर्शीला गणरायांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. या दिवशी पांझरा नदीच्या पात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन हाेत असते. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली असून ते पूर्णत्वास आले आहे. कोरोनामुळे यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. विसर्जन मिरवणुकीसह वाद्य वााजविण्याससुद्धा परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तसेच घरगुतीसह खासगी आणि सार्वजनिक मंडळांना रात्री १० वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. पांझरा नदीलगत अशा ३७ ठिकाणी विसर्जनासाठी सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी स्वच्छ पाण्याने भरलेले हौद मूर्ती विसर्जनासाठी सोय करण्यात येणार आहे. याशिवाय निर्माल्य संकलनाचीदेखील सोय करण्यात येणार आहे. हत्तीडोह परिसरात विशेष सुविधा करण्यात येणार आहे. या भागात चार सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. प्रखर असे विद्युत दिवे लावण्यात येणार आहेत. डेडरगाव तलाव, नकाणे तलाव आणि एमआयडीसी येथील तलावात मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अनंत चतुदर्शीला अनेक भाविक जलप्रदूषण होऊ नये म्हणून मूर्ती दान करतात किंवा कृत्रिम हौदात तिचे विसर्जन करत असतात. त्यानंतर महापालिकातर्फे सर्व मूर्तींचे विधीवत पूजन करून विसर्जन केले जाते. विसर्जनस्थळी जमा झालेल्या मूर्ती वाहून नेण्यासाठी महापालिकेने एसटी महामंडळाकडे २० ते २५ बसेसची मागणी केलेली आहे.